भाऊबंदकी अन‌् नात्यागोत्यांत रंगला राजकीय आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:14+5:302021-01-13T04:55:14+5:30

मागील २५ वर्षांपासून येथील ग्रामपंचायतीवर पं.स.चे माजी सदस्य नरसाप्पा देशमुख व माजी सरपंच मारुती देशमुख या दोन सख्ख्या बंधूंची ...

Rangala is a political arena in the fraternities | भाऊबंदकी अन‌् नात्यागोत्यांत रंगला राजकीय आखाडा

भाऊबंदकी अन‌् नात्यागोत्यांत रंगला राजकीय आखाडा

Next

मागील २५ वर्षांपासून येथील ग्रामपंचायतीवर पं.स.चे माजी सदस्य नरसाप्पा देशमुख व माजी सरपंच मारुती देशमुख या दोन सख्ख्या बंधूंची सत्ता होती. असे असताना मागील १० वर्षांपूर्वीच्या निवडणुकीदरम्यान या दोन देशमुख बंधूंमध्ये राजकीय कलह निर्माण झाल्याने दोघांची फूट झाली आणि दोन बंधूंचे गट निवडणुकीत एकमेकांविरुद्ध ठाकले. यानंतर निवडणुकीत नरसाप्पा देशमुख गटाने ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले. तसेच मागील पंचवार्षिक निवडणुकीतही नरसाप्पा देशमुख गटाने ग्रामपंचायतीवरील सत्ता कायम ठेवून नरसाप्पा देशमुख यांचे पुत्र आदिनाथ देशमुख यांच्या रूपाने गावकारभारी म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार चालविला.

होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या दोन देशमुख बंधूंच्या गटात निवडणूक होत असताना काही अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. देशमुख बंधूंच्या दोन्ही गटांनी निवडणूक प्रतिष्ठेची करून चुलते-पुतणे, जावा-जावा, नणंद-भावजय, भाऊभावकी अन‌् नात्यागोत्यांतील उमेदवार निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे केल्याने चांगली चुरस निर्माण झाली आहे.

अशी आहे भाऊबंदकी-नात्यागोत्यांतील लढत

यामध्ये प्रभाग दोनमधून नरसाप्पा देशमुख यांचे सुपुत्र विद्यमान सरपंच आदिनाथ देशमुख आणि माजी झेडपी सदस्य

बाळासाहेब देशमुख यांचे पुत्र महेश देशमुख या काका-पुतण्यामध्ये लढत होत आहे. प्रभाग चारमधून नरसाप्पा देशमुख यांची सून कल्पना देशमुख व मारुती देशमुख यांची सून बबिता देशमुख या चुलत जावा-जावांमध्ये लढत होत आहे. प्रभाग एकमधून विठ्ठलचे माजी उपाध्यक्ष स्व. कृष्णात पुरवत यांचे नातू अभिषेक पुरवत आणि राहुल पुरवत या काका-पुतण्यामध्ये लढत होत आहे. तर प्रभाग तीनमधून तेजमाला पांढरे आणि तृप्ती पांढरे-देवकते- या नणंद-भावजय समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. शिवाय महादेव व्यवहारे-दिलीप व्यवहारे, महेंद्र शिंदे-बापूराव शिंदे, रेखा गायकवाड-सीमा गायकवाड, बाळूबाई खारे-लुमावती खारे, सतीश माने-तुकाराम माने व ज्योती शिंगटे-मनीषा शिंगटे या जवळच्या भावकीतील लढती लक्षवेधक ठरणार आहेत. एकंदरीतच, करकंब ग्रामपंचायतीचे निवणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, आता नात्या-नात्यामधील आणि भाऊ-भावकीतील लढतीमुळे चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.

Web Title: Rangala is a political arena in the fraternities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.