आबांच्या निरोपाला रांगोळी अन् फुलांचा सडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:22 AM2021-08-01T04:22:03+5:302021-08-01T04:22:03+5:30
अंत्ययात्रेच्या मार्गावर लोकांनी दूतर्फा गर्दी केली होती. अनेकांच्या हातात फुले होती. अनेकांनी आपल्या घराच्या माडीवरुन, इमारतीवरुन फुलांची उधळण केली. ...
अंत्ययात्रेच्या मार्गावर लोकांनी दूतर्फा गर्दी केली होती. अनेकांच्या हातात फुले होती. अनेकांनी आपल्या घराच्या माडीवरुन, इमारतीवरुन फुलांची उधळण केली. संबंध शहर- तालुका शोकसागरात बुडाल्याचे दिसून आले.
----
जुन्या सवंगड्याने शेवटचे हात जोडले
गणपतआबा आपल्यातून गेले हे ऐकून त्यांचे जुने सवंगडी, सहकारी महादेव जानकर यांना अश्रू अनावर झाले. काठीचा आधार घेत त्यांनी आबांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करून अखेरचे हात जोडून अभिवादन केले.
अंत्ययात्रा ज्या रस्त्याने जाणार होती, त्या रस्त्याच्या दुतर्फी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कचेरी रोड, जय भवानी चौक, स्टेशन रोड, गणपतरावांचे निवासस्थान ते महात्मा फुले चौकापर्यंत रांगोळी काढून रस्त्यावर फुले अंथरली होती. वाहतुकीची कोंडी होऊ नये, सर्वांना आबांच्या पार्थिवाचे दर्शन घेता यावे यासाठी पोलिसांनी अंत्ययात्रेच्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सर्व मार्ग बॅरिकेटिंग लावून बंद केले होते.
----
आता आमचा देव कुठं शोधू
आता दर्शन होणे नाही यासाठी हजारोंचा समुदाय मिळेल ते वाहन पकडून सूतगिरणीच्या पाठीमागे असलेल्या अंत्यविधीच्या ठिकाणी जमला होता. अंत्यविधीसाठीचा चौथरा फुलांनी सजविलेला होता. प्रत्येकाचा चेहरा निस्तेज दिसून आला. ‘आता आमचा देव कुठं शोधू’ असाही हंबरडा बुजुर्गातून ऐकावयास येत होता.
-----
शहरभर श्रद्धांजलीचे फलक
- अनेक वर्षे आमच्या देवानं आमच्यावर माया केली. त्यांना शेवटचा दंडवत, विनम्र अभिवादन, त्यांना शेवटची श्रद्धांजली अशा भावना व्यक्त करणारे फलक शहरभर लावल्याचे दिसून आले.
----
चोरट्यांनी इथंही केली हातसफाई
अंत्ययात्रेत चोरट्यांनी सात ते आठजणांची सोन्याची चेन आणि चार ते पाचजणांची पाकिटे लंपास केली. यात जवळपास १५ तोळे सोने आणि हजारो रुपयांचा समावेश आहे. यामध्ये वकीलही सुटले नाहीत. सांगोला पोलिसांकडे रात्री उशिरा या घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
-----