डिसले गुरुजींची भरारी, जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 09:23 AM2021-06-03T09:23:52+5:302021-06-03T09:27:20+5:30

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे.

Ranjitsingh Disale Guruji's appointment as World Bank Education Advisor | डिसले गुरुजींची भरारी, जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती

डिसले गुरुजींची भरारी, जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती

googlenewsNext
ठळक मुद्देग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई - सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील डिसले गुरुजींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवला अन् त्यांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. काही दिवसांपूर्वी गुरुजींच्या नावाने स्कॉलरशीप सुरू करण्यात आली होती. तसेच, ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वरही त्यांची नेमणूक करण्यात आली. आता जागितक बँकेच्या शिक्षण सल्लागार समितीवरही त्यांना नेमण्यात आलं आहे. त्यामुळे, एका जिल्हा परिषदेच्या गुरुंजींनी गगनभरारीच घेतल्याचं दिसून येतंय. 

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कामात आता झेडपीच्या गुरुजींचं योगदान असणार आहे. जगभरातील 12 व्यक्तींची या समितीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आली आहे. त्यामध्ये बार्शीच्या डिसले गुरुजींचा समावेश आहे. 

या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21 व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं डिसले गुरुजींनी सांगितले. जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. 

ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकादमीवरही निवड
चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘चेग डॉट ओआरजी’च्या सोबतीने वार्के फाऊंडेशनने हा पुरस्कार सुरू केला आहे. अध्ययनावर, तसेच एकूण समाजावर आपला ठसा उमटवणाऱ्या असामान्य विद्यार्थ्यांचे प्रयत्न जगापुढे आणण्यासाठी नवे व्यासपीठ म्हणून ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ’ सुरू करण्यात आले आहे. अभिनेते अ‍ॅश्टन कुचर व मिला कुनिस, अमेरिकेतील महिलांच्या राष्ट्रीय चमूतील खेळाडू जुली एर्ट्झ व त्यांचे पती झाक एर्ट्झ हे ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकादमीचे इतर सदस्य आहेत. या ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वरही डिसले गुरुजींची नेमणूक करण्यात आली आहे. 

रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील स्कॉलरशिप

काही दिवसांपूर्वी भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. 'कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप' या नावाने ४०० युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील दहा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून पुढील दहा वर्षे १०० मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

सोलापूरच्या परतेवाडीती शाळेचे गुरुजी

दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.

Read in English

Web Title: Ranjitsingh Disale Guruji's appointment as World Bank Education Advisor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.