माहिती अधिकार कार्यकर्ता बशीर जहागीरदारविरोधात खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:04+5:302021-04-20T04:23:04+5:30
टेंभुर्णी : शिवसेनेचे संजय कोकाटे यांना दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते बशीर बाबासाहेब जहागीरदार याच्याविरुद्ध टेंभुर्णी ...
टेंभुर्णी : शिवसेनेचे संजय कोकाटे यांना दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते बशीर बाबासाहेब जहागीरदार याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांनी रविवारी रात्री खंडणीचा गुन्हा नोंदला आहे. याबाबत संजय शिवलाल कोकाटे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार संजय कोकाटे यांनी केलेल्या बांधकामाबद्दल बशीर जहागीरदार यांनी तक्रार केली होती. २८ मार्च २०२१ रोजी दुपारी ३ वाजता बशीर जहागीरदार हे कोकाटे यांच्या घरी गेले. म्हणाले, मला तुमच्याबरोबर चर्चा करावयाची आहे. त्यावेळी कागदपत्रे पाहून बशीर जहागीरदार म्हणाले की, जर मला दोन लाख रुपये दिले तर मी तुमच्या इमारतीबाबत केलेली तक्रार मागे घेतो. तेव्हा कोकाटे यांनी पैसे देण्यास नकार दिला. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कोकाटे हे त्यांच्या पेट्रोल पंपाकडे निघाले होते. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रस्त्यावर जहागीरदार कोकाटे यांना भेटले आणि विचार कर २ लाख रुपये देऊन विषय संपव. नाहीतर वेगवेगळ्या प्रकारात त्रास देऊन बदनामी करीन. यावर कोकाटे यांनी पोलिसात तक्रार देईन म्हणताच तत्पूर्वीच स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्याचे सुनावले. मी माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याने पोलीस माझे काही करू शकत नाहीत म्हणत त्याने दमदाटी केली. तेव्हा तेथे अमर पवार, विकास डोके, विजय पवार, तुकाराम गायकवाड हे लोक सोबत होते. कोकाटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.
---
देणगी जादा घेऊन कमी रक्कमेची पावती
बशीर जहागीरदार चालवत असलेल्या ट्रस्टला देणगी म्हणून धनाजी कदम यांच्याकडून २५ हजार रुपये घेऊन ५ हजारांची पावती दिली. तसेच विशाल कांबळे यांच्याकडून २५ हजार रुपये घेऊन ५ हजारांची पावती तर इंद्रजीत वामन काळे यांच्याकडून ४० हजार घेऊन ११ हजारांची पावती दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच समाधान काळे यांच्याकडून २१ हजार व सविता भोसले यांना दमदाटी करून २१ हजार रुपये घेऊन पावतीच दिली नाही. त्याच प्रमाणे नितीन पाटील, दत्तात्रय कवडे,नितीन महाडिक, गणेश मस्के, राहुल खटके, कृष्णा गायकवाड व संजय खटके अशा लोकांकडून खंडणी मागून घेतली असल्याचे कोेकाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.