दानवेंचा 'तो' व्हिडिओ बनावट, मोडतोड केलेला; भाजपाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 11:12 PM2019-03-25T23:12:52+5:302019-03-25T23:13:32+5:30
सोलापूरातील हेरिटेज येथे सोमवारी महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते.
मुंबई : भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुलवामा हल्ल्यावर केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला होता. यावरून भाजपा आणि दानवे ट्रोल झालेले असताना भाजपाने हा व्हिडिओ बनावट असल्याचा खुलासा केला आहे. तसेच या भाषणाच्या वक्तव्यांची मोडतोड करून विरोधकांनी बदनामी केल्याचा आरोप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय जवानांनी पाकिस्तानात घुसून हल्ला केला. याचा गौरव करताना दानवे यांनी सोलापूरमध्ये जे भाषण केले त्याच्या व्हिडिओमध्ये फेरफार करण्यात आले आहेत. तसेच ही मोडतोड केलेली क्लिप एका राजकीय पक्षाने व्हायरल केल्याचा आरोपही उपाध्ये यांनी केला आहे. याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
दानवे यांनी बोलताना थांबल्याचा फायदा या व्हिडिओमध्ये उठविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेच का @BJP4India चे बेगडी देशप्रेम??
— NCP (@NCPspeaks) March 25, 2019
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांनाच भाजपा प्रदेशाध्यक्ष @raosahebdanve यांनी ठरवले अतिरेकी...#NCP#NCP2019@BJP4Maharashtrapic.twitter.com/ZjjbEEkUGp
पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना, पाकिस्तानने देशातील ४० अतिरेकी मारले, असं विधान त्यांनी केलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दानवेंनी शहीद जवानांचा अपमान केल्याची तीव्र भावना नेटकरी व्यक्त करताहेत. या विधानावरून विरोधी पक्षांनीही दानवे लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दानवेंचा याबाबतच व्हिडीओ शेअर करुन त्यांना हेच का भाजपाचे बेगडी देशप्रेम? असा प्रश्न विचारला आहे.
सोलापूरातील हेरिटेज येथे सोमवारी महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते. आज देशामध्ये भयानक युद्धजन्य परिस्थिती आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आता देश सुरक्षित राहू शकतो, अशी तमाम देशवासीयांची भावना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि मोदींचे हात बळकट करा असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. यावेळी बोलत असताना दानवेंची जीभ घसरली.