बांधावरुन म्हैस नेल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग; आरोपीस १ वर्षाचा कारावास, २० हजारांचा दंड
By शीतलकुमार कांबळे | Published: February 1, 2024 06:32 PM2024-02-01T18:32:33+5:302024-02-01T18:34:24+5:30
१४ वर्षांपूर्वी म्हणजे २५ सप्टेंबर २०१० रोजी पीडित महिलेने आरोपीच्या शेतातील बांधावरून म्हैस नेली होती.
बार्शी: शेताच्या बांधावरून म्हैस नेल्याच्या कारणावरून एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. विजयकर यांनी आरोपी प्रकाश नामदेव गोडगे (रा. शेळगाव आर) यास एक वर्षाचा सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबरोबरच या दंडातील १५ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून पीडितेस द्यावेत व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. १४ वर्षांपूर्वी म्हणजे २५ सप्टेंबर २०१० रोजी पीडित महिलेने आरोपीच्या शेतातील बांधावरून म्हैस नेली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी दुसऱ्या दिवशी २६ सप्टेंबर रोजी तिच्या घराच्या प्रांगणात येऊन तिला शिवीगाळ करून विनयभंग केला.
पीडित महिलेने वैराग पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा तपास पोलिस नाईक शेटे यांनी करून आरोपीविरुद्ध बार्शी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी होऊन यामध्ये आरोपीस शिक्षा सुनावली. यात पोलिस निरीक्षक मोरे यांनी मार्गदर्शन केले. सरकारच्या वतीने ॲड. भादुले यांनी तर कोर्ट पैरवी म्हणून ए.एम. शेख यांनी काम पाहिले.