उजनीत आढळले दुर्मीळ सोनेरी कासव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 06:20 AM2020-12-07T06:20:05+5:302020-12-07T06:20:50+5:30
जगभरातून दुर्मीळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनीच्या ४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच इंदापूर तालुक्यात भिगवणजवळ डिकसळ येथे मासेमारी करताना सापडले आहे.
करमाळा (जि. सोलापूर) : उजनीचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्याच्या सरहद्दीवरील कोंढार - चिंचोली व डिकसळ (ता. इंदापूर) हद्दीत मासेमारी करणाऱ्या दांपत्यास दुर्मीळ सोनेरी कासव सापडले. जागतिक पातळीवर होणाऱ्या तस्करी प्रकारात या कासवाचा प्रथम क्रमांक लागतो.
जगभरातून दुर्मीळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनीच्या ४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच इंदापूर तालुक्यात भिगवणजवळ डिकसळ येथे मासेमारी करताना सापडले आहे. सामान्य कासवांपेक्षा इंडियन स्टार कासव सुंदर, असामान्य व मनमोहक आहे. त्याच्या बाह्य कवचावर ताऱ्यांप्रमाणे दिसणारे मनमोहक सोनेरी रंगाचे सप्तर्षी ठिपके आहेत. कासवांच्या प्रजातीमध्ये इंडियन स्टार जातीच्या कासवाचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेच्या वाळवंटात तसेच पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका या देशांत ड्राय झोन भागात हे कासव आढळते. भारतात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल येथे असे कासव आढळून आल्याच्या नोंदी आहेत. फेंगशुई, जादूटोणा, औषध निर्मितीसाठी या कासवांची तस्करी जागतिक पातळीवर चालते.
सोनेरी पहाट पण...
विनोद अभिलाल काळे व त्यांची पत्नी शिवानी हे दोघे नेहमीप्रमाणे उजनी पाणलोट क्षेत्रात डिकसळ भागात पहाटे मासेमारीसाठी गेले होते. या वेळी उगवत्या सूर्य किरणांमध्ये त्यांना चमकणारी वस्तू दिसली.
त्यामुळे मोठ्या कुतूहलाने जवळ जाताच त्यांनी आजपर्यंत कधीच पाहिले नसलेले कासव दिसले. त्यांना हे कासव दुर्मीळ असल्याची जाणीव झाली. वास्तविक, तस्करीचा विचार मनात आला असता तर ही पहाट त्यांना सोनेरी ठरली असती. मात्र, तसे न करता त्यांनी हे कासव वनविभागाच्या ताब्यात दिले.
पाठीवर नक्षत्रांचा आलेख असलेले नजाकतदार कासव आशिया खंडातील भारतीय उपखंडातच आढळते. या कासवांचा वावर पाकिस्तानात सिंध प्रांत, पश्चिमेकडे बंगाल प्रांतापर्यंत व दक्षिणेत श्रीलंकापर्यंत तुरळकपणे पाहायला मिळतो. दुर्मीळ प्रजातीचे हे कासव उजनीच्या पोटात आढळल्याने धरण पाणलोट क्षेत्रात जैवविविधता असल्याचे स्पष्ट होते.
- प्रा. डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ प्राणीशास्त्रज्ञ