नियतीच्या न्यायालयात सोलापुरातील रजाक वकिलांनी जिंकला आयुष्याचा खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 02:30 PM2019-01-03T14:30:57+5:302019-01-03T14:34:04+5:30
राजकुमार सारोळे सोलापूर : पाच वर्षे किडनीच्या आजाराला तोंड देऊन, प्रत्यारोपणानंतर आठ महिन्यांनी फौजदारी वकील रजाक शेख नव्या वर्षापासून ...
राजकुमार सारोळे
सोलापूर : पाच वर्षे किडनीच्या आजाराला तोंड देऊन, प्रत्यारोपणानंतर आठ महिन्यांनी फौजदारी वकील रजाक शेख नव्या वर्षापासून पुन्हा न्यायालयात खटल्याच्या कामकाजासाठी हजर झाले. खटल्यात अडकलेल्या नागरिकांना सोडविताना त्यांनी आरोग्याचा खटला जिंकला अशी प्रतिक्रिया त्यांच्या सहकारी मित्रांनी दिली.
फौजदारी व दिवाणी वकिलांमध्ये रजाक शेख यांनी ३५ वर्षे काम केले आहे. या काळात अनेक मोठे गाजलेले खटले त्यांनी चालविले. अनेक आरोपींना खटल्यातून निर्दोष सोडवले. पण सन २0१४ मध्ये केवळ बीपी वाढल्याचे निमित्त होऊन ते स्वत:च्या आरोग्याच्या खटल्यात अडकले. २२ जुलै २0१४ रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. बीपी वाढल्याने त्यांनी जवळच्या डॉक्टर मित्राला फोन केला. त्या मित्राने सहकारी रुग्णालयात येण्यास सांगितले. तेथे त्यांची परिस्थिती पाहून अॅडमिट करण्यात आले. डॉक्टरांनी मायनर अॅटॅक येऊन गेल्याचे सांगितले. सलाईन लावल्यावर त्यांचे अंग सुजू लागले. तपासणीअंती त्यांच्या किडन्या काम करीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना डायलेसीस सुरू करण्यात आले. उपचारानंतर डायलेसीस हे त्यांच्या कायम नशिबी आले. डायलेसीस बंद करण्यासाठी त्यांनी किडनी मिळविण्यासाठी नोंद केली.
आरोग्याची ही स्थिती झाली तरी ते डगमगले नाहीत. त्यांनी चार दिवस डायलेसीस व दोन दिवस कोर्ट काम असा दिनक्रम सुरू केला. अशातच दोन वर्षांपूर्वी म्हणजे २0१६ मध्ये पुण्यात मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. यातूनही ते बाहेर पडले व कोर्टाच्या कामाला हजेरी लावू लागले. मार्च २0१८ मध्ये त्यांना कोईमा मेडिकल सेंटर अॅन्ड हॉस्पिटलने किडनी शस्त्रक्रियेसाठी बोलाविले. मार्च व एप्रिल असे दोन महिने किडनी जुळणीचे परीक्षण चालले. त्यानंतर जूनमध्ये त्यांना अॅडमिट होण्यास सांगितले. १६ आॅगस्ट रोजी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर शेवटी नवीन वर्षाच्या प्रारंभी त्यांनी कामास सुरुवात केली.
पहिल्याच दिवशी जामीन
- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. के. अनभुले यांच्या न्यायालयात त्यांनी बिराजदार यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटीप्रकरणी जामिनावर युक्तिवाद केला. सायंकाळी आरोपीस जामीन मिळाला. हा युक्तिवाद संपवून ते बारच्या चेंबरकडे जात असताना अनेक जुने मित्र भेटले. न्यायालयातील खटले जिंकणारे वकील अनेक असतील पण आरोग्यासाठी संघर्ष करून पुन्हा खटल्यासाठी उभा राहणारा वकील म्हणून सर्वांनी त्यांचे कौतुक केले.