पुन्हा खोळंबा; सोलापूर शहरात पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 12:14 PM2020-12-07T12:14:39+5:302020-12-07T12:14:44+5:30
टाकळी येथील पंप गेली ६० तास बंद; गेली ६० तास टाकळी योजनेवरून पाणीपुरवठाच झाला नाही
सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे महापालिकेचे टाकळी येथील पंप गेली ६० तास बंद राहिले. या कारणामुळे शहरात पुढील आठवडाभर पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाने रविवारी रात्री कळविले.
सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात टाकळी ते सोरेगाव ही पाइपलाइन काही ठिकाणी नव्याने टाकण्यात येत आहे. नव्या पाइनलाइनच्या जोडणीच्या कामासाठी शुक्रवारी शटडाउन घेण्यात आले. हे काम रविवारी दुपारी १२ वाजता पूर्ण झाले. त्यानंतर टाकळी येथील एक एक पंप सुरू करण्यात आला. सोरेगाव येथे पाणी पोहोचण्यास सायंकाळचे सहा वाजले. गेली ६० तास टाकळी योजनेवरून पाणीपुरवठाच झाला नाही. या कालावधीत शहराचा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला. पुढील आठवडाहून अधिक दिवस शहरातील पाणीपुरवठा पाच ते सहा दिवसाआड होईल. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
तीन स्रोत तुडुंब, तरीही पाण्याची बोंब
उजनी, औज बंधारा, हिप्परगा तलाव या शहराच्या तीन जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड होत असल्याचे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि महापालिकेने एकाचवेळी मोठे शटडाउन घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने कामे करणे अपेक्षित होते. परंतु, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे नियोजन चुकल्याने शहरावर संकट ओढवल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.