कोरोना ग्राम दक्षता समितीच्या सतर्कतेने खुनाला फुटली वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:41+5:302021-06-09T04:27:41+5:30

पानगाव : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच शनिवारी रात्री कळंबवाडी ( पा. ) येथील सोनाबाई सचिन येवले ( ३५ ) हिचा ...

Read the murder erupted with the vigilance of the Corona Village Vigilance Committee | कोरोना ग्राम दक्षता समितीच्या सतर्कतेने खुनाला फुटली वाचा

कोरोना ग्राम दक्षता समितीच्या सतर्कतेने खुनाला फुटली वाचा

Next

पानगाव : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच शनिवारी रात्री कळंबवाडी ( पा. ) येथील सोनाबाई सचिन येवले ( ३५ ) हिचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गावातील प्रमुख मंडळी व कोरोना ग्राम दक्षता समितीच्या सतर्कतेमुळे या खून प्रकरणाला वाचा फुटल्याचे पोलिसांनी सांगितले.

शनिवारी रात्रीपासून सचिन येवले याने गावातील नातेवाईकांशी फोनवरुन संपर्क साधायला सुरुवात केली. सोनाबाईची प्रकृती कोरोना व म्युकरमायकोसिसमुळे गंभीर असून, तिला डोंबिवलीहून गावाकडे घेऊन येत असल्याचा निरोप दिला. रस्त्यात एका दवाखान्यात तिच्यावर उपचाराचा प्रयत्न केला पण रस्त्यातच ती मरण पावली आहे. प्रेत घेऊन उशिरापर्यंत पोहोचतो. गावापलीकडील शेतात मर्यादित उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करु या. असा संवाद त्याने नातेवाईकांशी साधला होता.

यापूर्वीच सोनाबाईच्या सासूने ही सुनबाई कोरोनाने आजारी असल्याचा कांगावा केला होता. नातेवाईकांनी मात्र सचिनच्या या गोष्टी पोलीस पाटील व इतरांच्या कानावर घातल्या. त्यानंतर उशिरा रात्री सर्वांनी मिळून सचिनला निर्णय सांगितला की जर कोरोनाने सोनाचे निधन झाले असेल तर बार्शीच्या हॉस्पिटल किंवा नगरपालिका दवाखान्यात घेऊन जा. गेल्या काही वर्षाच्या कौटुंबिक कलहाच्या पार्श्वभूमीवर काही घातपात असेल तर मग पोलिसात जाण्याचा सल्ला दिला.

मग मात्र सचिनने मध्यरात्रीनंतर गाडीतील प्रेतासह वैराग पोलिसात धाव घेतली. त्याने पानगाव जवळचे घटनास्थळ दाखवले. मात्र ते बार्शी ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने पहाटे त्यांची कुमक येऊन पुढील कारवाई चालू झाली. सतर्क ग्रामस्थ व समितीमुळे एका खुनाला वाचा फुटली. या प्रकरणात सचिन येवले याला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी ११ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

---

संशयाचं भूत शिरलं अन्...

सचिन येवलेचा विवाह मामाची मुलगी सोनाबाई जाधव हिच्यासोबत १४ वर्षांपूर्वी झाला होता. संसार वेलीवर एक मुलगी, एक मुलगा अशी फुलंही फुलली होती. डोंबिवलीत सचिनचा ट्रॅव्हल्सचा तर आई व पत्नी यांचा फळ विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू होता. संसार सुखात सुरु होता. धनसंचय वाढत होते पण नकळत विश्वास संपत चालला होता. व्यभिचारिपणा, चारित्र्यहिनता, संशयाचे भूत या गोष्टींनी मनात घर केलं होतं. पण हे मळभ झटकायला ज्येष्ठांची भूमिका कमी पडली. प्रपंचात दरी वाढली. सुसंवाद संपून फक्त वाद राहिला. परिणामी संशयाने सचिन- सोनाचा संसार उद्ध्वस्त झाल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

---

- ०७ सचिन येवले

०७ सोनाबाई येवले

Web Title: Read the murder erupted with the vigilance of the Corona Village Vigilance Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.