वाचन, गाणं अन् समाजसेवेच्या छंदातून पोलिसांचा वाढता ताणतणाव होतो कमी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 01:01 PM2021-05-11T13:01:13+5:302021-05-11T13:01:20+5:30
जनतेच्या सुरक्षेसाठी स्वत: रस्त्यावर : वेळ मिळेल तशी जोपासतात कला
सोलापूर : कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे जो-तो घरी बंदिस्त आहे. असे असतानाही जनतेचे कवचकुंडल म्हणून पोलीस आपली ड्युटी चोखपणे बजावत असताना त्यांच्यावर मोठा ताण येतो. हा ताण घालवण्यासाठी काही पोलीस वाचन, तर काही जण गाणं गाण्याचा छंद जोपासत आहेत. बहुतांश पोलीस समाजसेवेचे व्रत जोपासत असताना त्यांच्या मनावरील असलेले दडपणही निघून जाते. पोलिसांना बोलते केले असता त्यांच्यातून हा सूर ऐकावयास मिळाला.
मानसिक आनंद मिळण्यासाठी आपल्यातील कला, छंद एक आधार देऊन जातो. आपल्या छंदामुळे स्वत:ची ओळख निर्माण होते. तसेच इतरांनाही एक वेगळा आनंद मिळतो. लॉकडाऊनमुळे रस्ते ओस पडले आहेत. ओस पडलेल्या रस्त्यावर बंदोबस्त करताना वेळ जावा, यासाठी काही पोलीस आपल्या कलेचे दर्शन घडवतात. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही त्या कलेने वेगळा आनंद मिळतो.
वर्षातील बारा महिने पोलिसांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे काम लागलेले असते. यामुळे त्यांना आपल्या कुटुंबीयांनासुद्धा वेळ देऊ शकत नाहीत; पण काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यातल्या त्यात वेळ काढून आपल्या छंदाला नव्याने आकार देत असतात.
पोलिसांना ताणतणाव, कोरोनाची भीती, उदास वाटणे स्वाभाविक आहे. रोजच ताण घेऊन जगण्यापेक्षा एखादी कला अथवा छंद जोपासला पाहिजे. मला बागकामाची आवड असल्यामुळे रोज जवळपास दीड तास मी बाग कामाला देते. यातून माझा तणाव निघून जातो. तरी थोडे उदास वाटले तर मी पियानो वाजवते, गाणं गाते, कविता लिहिते, शायरी करते. त्यामुळे आलेला तणाव निघून जातो.
- दीपाली धाटे, पोलीस उपायुक्त
वाचन आणि संगीत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पोलीस उपनिरीक्षक झाल्यावर माझी पोस्टिंग औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील कन्नड पोलीस स्टेशनला झाली. तिथे वाचन आणि संगीताची आवड निर्माण झाली. तेव्हापासून आजपर्यंत मी हे दोन्ही छंद जोपासले आहेत. कामाचा कितीही ताण असला तरी पुस्तक वाचल्यानंतर तो ताण दूर होतो.
- संजीव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
मला पूर्वीपासूनच वाचनाची, सामाजिक कार्याची तसेच सूत्रसंचालनाची आवड आहे. मला चारोळ्या, कविता यांचा संग्रह करण्याची सवय लागली. रात्री गोळ्या घेऊन झोप लागण्याची वाट पाहण्यापेक्षा पुस्तकांचं वाचन करणे हेच मी झोपेचं औषध समजतो.
- मलकप्पा बणजगोळे, पोलीस कॉन्स्टेबल
सध्या कामावर ताण घालवण्यासाठी मी केलेले नाटकातील परफॉर्मन्स पाहण्यात वेळ घालवतो. मी माझ्या मुलांसोबत घरच्या घरीच छोटे छोटे व्हिडिओ तयार करतो. त्यांना थोडाफार अभिनय शिकवतो. भाषा कशी उच्चारायची, नाटकात कसं बोलायचं याच्या काही टिप्स देत राहतो. कधी कधी खूपच तणाव आल्यास मी गाणंही गातो.
- इम्तियाज मालदार, पोलीस कॉन्स्टेबल