आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यास तयार ! चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:04 PM2018-05-08T17:04:01+5:302018-05-08T17:04:01+5:30
देशाला सुरक्षित ठेवायचे असेल तर काँग्रेसला बाजूला ठेवणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करताना काँग्रेसच देशाची दुश्मन असल्याचा घणाघाती आरोप बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
सोलापूर : राष्ट्रीय विचाराच्या मतांची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहोत. परंतु, टाळी एका हाताने वाजत नाही. राज्यात भाजपाविरोधी वातावरण असल्याचे उद्धव ठाकरे सांगत असले तरी तसे कुठेही दिसत नाही. जिथे निवडणूक होतेय तिथे भाजपा जिंकत आहे. देशाला सुरक्षित ठेवायचे असेल तर काँग्रेसला बाजूला ठेवणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करताना काँग्रेसच देशाची दुश्मन असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत बोलताना केला.
ईव्हीएमचा घोळासंदर्भात बोलताना पाटील यांनी पंजाबमध्ये काँग्रेस निवडून आली आहे. तिथेही ईव्हीएमला दोष द्याल का? असा सवालही त्यांनी पत्रकारांना केला. सोलापुरात नव्या महसूल भवनचे काम चांगले झाल्याचे सांगण्यात आले आहे. आता तेथे फर्निचरसह इतर कामे करणे अपेक्षित आहे. शासनाकडेही आता बराच निधी उपलब्ध असल्याने महसूल भवनच्या उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनविषयक कामातून राज्याला सहा टक्के निधी मिळतो. मुद्रांक शुल्क कार्यालयाकडूनही बराच निधी उपलब्ध झाला आहे. यातून मुद्रांक शुल्क कार्यालये आधुनिक करण्यात येतील. शासकीय गृहनिर्माण सोसायट्यांना दिलेल्या जमिनींबाबत नवीन धोरण आखण्यात येत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
फाळणीनंतर सिंधी समाजाला काही जमिनी देण्यात आल्या. या जमिनींवर पुनर्विकास करताना अनेक अडचणी येत होत्या. प्रत्येक वेळी शासनाकडे पैसे भरावे लागत होते. या जमिनी क्लास टूमधून क्लास वनमध्ये घेण्यात आल्या. त्याप्रमाणे शासकीय गृहनिर्माण सोसायट्यांना दिलेल्या जमिनी क्लास टूमधून क्लास वन करण्यात येतील, पण त्यासाठी निश्चित केलेली रक्कम शासनाकडे भरल्यानंतरच जमीन हस्तांतरण होईल.