सिंहासन, मंगलमूर्ती अन् इकोफ्रेंडली मखरांचा साज; बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज
By दिपक दुपारगुडे | Published: September 11, 2023 05:27 PM2023-09-11T17:27:27+5:302023-09-11T17:27:42+5:30
पूर्वी मखर सजवताना साड्यांचा वापर होत असे. परंतु, आता मखरासाठी रेडिमेड पडदे बाजारात दाखल झाले आहेत.
सोलापूर : गौरी-गणपतीच्या आगमनाचे. गौरी-गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे रेडिमेड मखर बाजारात दाखल झाले असून, आकर्षक मखर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. बालगोपाळांपासून सर्वांचा आवडता सण म्हणजे गौरी-गणपतींचे आगमन. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सोलापुरात सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी सोलापुरातील मधला मारुती, टिळक चौक येथे आकर्षक मखर उपलब्ध असून ते खरेदी करण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.
पूर्वी मखर सजवताना साड्यांचा वापर होत असे. परंतु, आता मखरासाठी रेडिमेड पडदे बाजारात दाखल झाले आहेत. गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक सजावट करण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यात वा कपड्यापासून तयार केलेल्या खरला सर्वाधिक मागणी होती. परंतु, यंदा बाजारात पर्यावरणपूरक मखरातही विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. यात लाकडाचा, कपड्याचा, वुलनचा वापर करून तयार करण्यात आलेली पर्यावरणपूरक मखराची मागणी जास्त असल्याची व्यापारी अशोक माळवदकर या व्यापाऱ्यांनी सांगितले.शहरात कपडे, लाकूड, गवत, वुलन अशा इकोफ्रेंडली साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक मखरांना जास्त मागणी असून, आद्याप हजारपेक्षा जास्त मखर कोल्हापूर, पुणे अन् मुंबई या ठिकाणी पाठविण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गृहिणीचे काम सोपे
पूर्वी बांबू, लाकडाचे मखर बनविण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत असे. आता मात्र बाजारात नवनवीन डिझाइनमध्ये रेडिमेड मखर उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे गृहिणीचे काम हलके आणि सोपे झाले आहे. गणपतीसाठी थर्माकोल मखरऐवजी हॅण्डमेड मखर यांना विशेष मागणी असल्याचे दिसून येते. यामध्ये मंदिर, कमळ, सिंहासन, मंगलमूर्ती असे विविध आकार उपलब्ध आहेत.