आवडीच्या क्षेत्रातच खरे भवितव्य
By Admin | Published: June 8, 2014 01:00 AM2014-06-08T01:00:13+5:302014-06-08T01:00:13+5:30
चंद्रकांत गुडेवार : लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअरचा समारोप
सोलापूर : भविष्यात यशस्वी होण्यासाठी आवड आणि इच्छा या दोन्ही गोष्टींचा विचार करून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यास खऱ्या अर्थाने आपले भवितव्य घडेल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले.
लोकमत अॅस्पायर आणि डी.एच.बी. सोनी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय एज्युकेशन फेअरच्या समारोपाप्रसंगी चंद्रकांत गुडेवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकमतचे सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे, सतीश मालू आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त चंद्रकांत गुडेवार पुढे म्हणाले की, पालकांनी मुलांवर कोणत्याही शिक्षणासाठी दबाव आणू नये. मुलांची आवड कशात आहे याची तपासणी पहिल्यांदा केली पाहिजे. केवळ एखाद्या क्षेत्रात जास्त पैसा मिळतो किंवा लवकर संधी मिळते याचा विचार करून इच्छा नसताना शिक्षण लादणे योग्य नाही. वयाच्या ३५ व्या वर्षांपर्यंत प्रत्येकाला पैशाचे आकर्षण असते त्यानंतर मात्र ते कमी होते. पैशाचा विचार न करता आवडीच्या क्षेत्रात काम केल्यास पैसा आपोआप मिळतो. आजच्या युगात अनेक संधी उपलब्ध आहेत, महाविद्यालये, इन्स्टिट्यूट मोठ्या प्रमाणात असल्याने आवडीचे शिक्षण घेणे शक्य आहे. मुलांनीही आपली क्षमता तपासली पाहिजे. आपण कोणत्या क्षेत्रात काम करू शकतो याचे आत्मपरीक्षण करावे आणि आपल्या आवडीच्या क्षेत्राशी निगडीत शिक्षण घेतले पाहिजे. जीवनातील स्वप्ने साकारण्यास वेळ लागणार नाही, असे आवाहन यावेळी आयुक्त गुडेवार यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान सहभागी शैक्षणिक संस्था आणि सहकार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोनी महाविद्यालयाचे सतीश मालू, लॉजीक इन्स्टिट्यूटचे शिवराज बागल, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या तन्वी देशपांडे, डी.वाय.पाटील महाविद्यालयाच्या रितीका हतवळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा कटारे यांनी केले तर आभार ईशा वनेरकर यांनी मानले.
---------------------------------
बक्षीस वितरण
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बालविकास मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या ड्रॉर्इंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये पहिली ते तिसरीमधील ‘ए-ग्रुप’मध्ये प्रथम क्रमांक मिळालेल्या विराज समर्थ, द्वितीय क्र. अभिषेक डोणे तर ‘बी-ग्रुप’ मध्ये प्रथम क्रमांक ऋषीकेश दंडगळ, द्वितीय क्रमांक-प्रांजली सुरवसे आणि तृतीय क्रमांक-रिया हिबारे यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.