मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणी प्रश्न सोडविणे हीच खरी श्रद्धांजली : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 09:02 AM2020-11-30T09:02:00+5:302020-11-30T09:02:44+5:30
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पंढरपूर दौऱ्यावर; आमदार भारत भालकेंच्या तिसऱ्या दिवशीचे सर्व विधी पूर्ण
पंढरपूर : विठ्ठल सहकारी कारखाना अडचणीतून बाहेर काढणे. मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावाचा पाणी प्रश्न मिटवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.
आ. भारत भालके यांच्या निधनानंतर चा तिसऱ्या दिवशी च्या विधीसाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सरकोली ( ता. पंढरपूर) येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या दरम्यान आ. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके व व्यकंटेश भालके यांनी तिसऱ्या दिवशीचे सर्व विधी पार पाडले.
पुढे पाटील म्हणाले, कोरोनामुळे सगळ्यात जादा पंढरपूरचे फार मोठे नुकसान झाले आहे. दिग्गज माणसं गेली. उपचारा दरम्यान आ. भालके नागरिकांचे प्रश्न सोडवत होते. शेवटपर्यंत ते विठ्ठल सहकारी साखर कारखाना काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. असे नेते खूप कमी असतात. अशा नेत्याचे निधन झाले यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी पालकमंत्री मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आ. दीपक साळुंखे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन लक्ष्मण पवार, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, रीपाई युवक आघाडीचे उपाध्यक्ष किर्तिपाल सर्वगोड, बबनराव आवताडे, संतोष सुळे, नागेश भोसले, किरण घाडगे, संदीप मांडवे, सुधीर धुमाळ उपस्थित होते.