या कारणामुळे लोकसभेचा निकाल लागणार दोन तास उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:45 PM2019-04-10T12:45:55+5:302019-04-10T12:48:51+5:30
सोलापूर जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री आणि ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
निर्णय अधिकारी :
सोलापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅटमधील पोहोच पावत्यांची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास किमान दोन तास लांबणीवर जाणार आहे. दुपारी चारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहील अशी माहिती माढा निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली.
२३ मे रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया रामवाडी येथील शासकीय गोदामात होणार आहे. सकाळी सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी पोस्टल मतपत्रिका मतदारांना पाठविण्यात येत आहेत. पोस्टाने हे मतदार मतपत्रिका पाठविणार आहेत. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी हाती घेण्यात येणार आहे. यासाठी १९ टेबल असणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील व्हीव्ही पॅटमधील पोहोच देणाºया पावत्यांची मोजणीही यावेळी करण्यात येणार आहे; मात्र पोहोच पावत्या या आकाराने लहान असल्याने मोजणीसाठी विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ईव्हीएमवर घेण्यात येणाºया मतदानाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोहोच देणाºया पावत्यांची मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रातील व्हीव्ही पॅट मशीनचे सील मतमोजणी दिवशी तोडण्यात येणार आहे.
मतदान व मोजणी दिवशी दारू दुकाने बंदचा आदेश
मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी. या कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मतदान व मतमोजणीच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री आणि ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.