या कारणामुळे येणार सोलापूरवर जलसंकट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:48 PM2019-05-14T12:48:09+5:302019-05-14T12:50:40+5:30
उजनीतून पाणी सोडण्यास उशीर झाल्यास शहरावर पाणीटंचाई ओढवणार
सोलापूर : शहर पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा सोमवारी कोरडा पडला. टाकळी इनटेक वेलमधील पाणी २२ मेपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. पुढील दोन दिवसांत उजनी धरणातून पाणी न सोडल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहराला उजनी ते सोलापूर जलवाहिनी, टाकळी ते सोरेगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. औज बंधाºयातील पाणी टाकळी इनटेक वेलमध्ये घेतले जाते. औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी इनटेक वेलमध्ये सोमवारी ९ फूट ६ इंच पाणी होते. हे पाणी २२ मेपर्यंत पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली. विभागीय दीपक म्हैसेकर यांनी नुकतीच टंचाई आढावा बैठक घेतली.
या बैठकीत उजनीतून सोलापूरसाठी १५ मे रोजी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. उजनीतून सोडलेले पाणी औजमध्ये पोहोचण्यास आठ दिवसांचा कालावधी लागतो. उजनी धरणातील पाणीपातळी खालावली आहे. उजनी पंपगृहासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलाशयातून दुबार पंपिंग सुरू केले आहे. उजनी पंपगृहातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. उजनीतून पाणी सोडण्यास उशीर झाल्यास शहरावर पाणीटंचाई ओढवणार आहे.
उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी टाकळी येथे संयुक्त पाहणी करतील. त्यानंतर पाणी सोडण्याबाबत निर्णय होईल.
- धीरज साळे,
अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण.