सहा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी, १५४ उमेदवार अखेर निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 03:16 PM2019-10-08T15:16:16+5:302019-10-08T15:18:45+5:30

सोलापूर विधानसभा निवडणूक; ८३ जणांची माघार: पंढरपूर, सांगोला, शहर मध्य मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार

Rebellion in six assembly constituencies, 3 candidates are finally in the fray | सहा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी, १५४ उमेदवार अखेर निवडणूक रिंगणात

सहा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी, १५४ उमेदवार अखेर निवडणूक रिंगणात

Next
ठळक मुद्देमाढा, माळशिरस, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर दुरंगी लढती होणारमाढ्यामध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांची लढत शिवसेनेचे संजय कोकाटे यांच्याशी होणार माळशिरसमध्ये भाजपतर्फे राम सातपुते आणि राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांच्यात थेट लढत होणार

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघात सोमवारी ८३ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. सोलापूर शहर मध्य, बार्शी, करमाळा, पंढरपूर, मोहोळ आणि सांगोला या सहा मतदार संघात बंडखोरी झाली असून, १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. अकरा विधानसभा मतदार संघात ८३ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

प्रतिस्पर्धांने उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सर्वच मतदार संघात पळापळ दिसून आली. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे दिलीप माने यांच्या विरोधात महेश कोठे यांनी बंडखोरी केली. उमेदवारी मागे न घेता कोठे यांनी शिवसेना सदसत्वाचा राजीनामा दिला. बाशींमध्ये शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्याविरूद्ध भाजपचे राजेंद्र राऊत यांनी आव्हान दिले आहे. करमाळ्यामध्ये शिवसेनेच्या रश्मी बागल यांच्याविरूद्ध विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके यांच्याविरोधात काँग्रेसचे शिवाजी काळुंगे यांनी उमेदवारी कायम ठेवत धक्का दिला. उमेदवारी मागे घ्यावी म्हणून त्यांना वारंवार पक्षश्रेष्ठीकडून सांगण्यात आले पण त्यांनी दिवसभर कोणाशी संपर्क होऊ नये म्हणून भ्रमणध्वनी बंद ठेवला. मोहोळमध्ये शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांच्याविरोधात मनोज शेजवाल यांनी बंडखोरी केली. सांगोल्यात शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्याविरोधात भाजपच्या राजश्री नागणे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. इच्छुकांच्या गर्दीमुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेसला जिल्ह्यात बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. 

मालक, बापूंचे कारभारी यशस्वी
सोलापूर शहर उत्तर मतदार संघात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात महेश कोठे यांनी अर्ज भरला होता. कोठे माघार घेतात की नाही याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यावर देण्यात आली होती. शेवटचे दहा मिनिटे राहिले तरी कोठे अर्ज माघार घेण्यासाठी आले नसल्याचा निरोप आल्याने पालकमंत्री देशमुख यांनी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांना संपर्क साधला. ‘यानू आयतू’ अशी विचारणा केल्यावर पलीकडून विक्रम यांनी ‘क्यलसा आयत’ू (काम झालं) असा निरोप दिल्यावर पालकमंत्री सुटकेचा श्वास घेतला. दक्षिणमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी होती. पण प्रत्येकाकडे पाठपुरावा करून अर्ज माघार घेण्यास भाग पाडण्याची जबाबदारी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अशोक निंबर्गी, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांनी पार पाडली. 

लक्षवेधक चौरंगी लढती
- पंढरपूर, करमाळा, सांगोला, मोहोळ आणि शहर मध्य मतदार संघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके, भाजपचे सुधाकरपंत परिचारक, अपक्ष समाधान आवताडे आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रा. शिवाजी काळुंगे यांच्यात लढत होणार आहे. करमाळ्यात विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आहे. त्यांची लढत शिवसेनेच्या उमेदवार रश्मी बागल, अपक्ष संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील—घाटणेकर यांच्याशी होणार आहे. सांगोला मतदार संघात शेकापकडून डॉ. अनिकेत देशमुख निवडणूक रिंगणात असून, त्यांची लढत शिवसेनेचे शहाजी पाटील, भाजपच्या बंडखोर उमेदवार राजश्री नागणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंके यांच्याशी होणार आहे. मोहोळमध्ये शिवसेनेने नागनाथ क्षीरसागर यांना उमेदवारी दिल्यावर मनोज शेजवाल यांनी बंडखोरी केली आहे. विद्यमान आमदार रमेश कदम यांनी अपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यशवंत माने निवडणूक रिंगणात आहेत. शहर मध्यमध्ये काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणीती शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचे दिलीप माने, माकपचे नरसय्या आडम आणि अपक्ष महेश कोठे यांनी लढत लक्षवेधी ठरणार आहे. 

जिल्ह्यात चार ठिकाणी होणार दुरंगी लढती
- माढा, माळशिरस, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर दुरंगी लढती होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. माढ्यामध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांची लढत शिवसेनेचे संजय कोकाटे यांच्याशी होणार आहे. माळशिरसमध्ये भाजपतर्फे राम सातपुते आणि राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांच्यात थेट लढत होणार आहे. अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासमोर भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांचे आव्हान राहणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची लढत काँग्रेसचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्याशी होणार आहे. आमदार बबनदादा शिंदे व सिद्धाराम म्हेत्रे यांना नवख्या उमेदवारांचे आव्हान पेलावे लागणार आहे. शहर उत्तरल बार्शीमध्ये दुरंगी लढतीचे चित्र आहे. शहर उत्तरमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटे, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशीवे यांच्याशी होणार आहे. बार्शीमध्ये श्विसेनेचे दिलीप सोपल, अपक्ष राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. 

Web Title: Rebellion in six assembly constituencies, 3 candidates are finally in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.