शिवसेनेत आलेल्या रश्मी बागलांना उमेदवारी दिल्यास बंडखोरी अटळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 01:31 PM2019-09-05T13:31:35+5:302019-09-05T13:41:00+5:30
सोलापुरातील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात दिलीप सोपल, दिलीप माने व्यासपीठावर: शिवाजी सावंत म्हणाले, उमेदवारीचे अधिकार सेनाप्रमुखांना
सोलापूर : शिवसेनेच्या झालेल्या निर्धार मेळाव्यात करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी नव्याने प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला. माजी आमदार दिलीप माने म्हणाले, मी कोणाची अडचण करणार नाही तर दिलीप सोपल यांनी माझा मार्ग मोकळा असल्याचे स्पष्ट केले.
शिवसेनेच्या जिल्ह्यातील सर्व आजी-माजी व नवीन पदाधिकाºयांचा मेळावा हुतात्मा स्मृती मंदिरात झाला. या मेळाव्यास जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, आमदार नारायण पाटील, माजी आमदार दिलीप सोपल, दिलीप माने, रतिकांत पाटील, शहाजीबापू पाटील, रश्मी बागल, नागनाथ क्षीरसागर, माजी सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, साईनाथ अभंगराव, प्रकाश वानकर, दीपक गायकवाड, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, महेश कोठे, संभाजी शिंदे, मुंबईच्या संजना घाडी, झेडपी सदस्या शैला गोडसे, शैला स्वामी, अस्मिता गायकवाड, उज्ज्वला येलुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी प्रास्ताविकात सेनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील माजी आमदार आल्यामुळे ताकद वाढल्याचे नमूद केले. गणेश वानकर यांनी दक्षिण सोलापूरची जागा सेनेला मिळावी, यासाठी आग्रही राहणार असल्याचे सांगितले. महेश कोठे यांनी जिल्ह्यातून सात आमदार निवडून आणण्याची तयारी असल्याचे सांगितले. नवीन लोकांच्या प्रवेशामुळे जुने लोक नाराज होणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. साईनाथ अभंगराव यांनी आम्ही ज्यांच्यावर टीका करायचे तेच आमच्या पक्षात आल्यामुळे आता अडचण झाल्याचे सांगितले.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आतापर्यंत केलेला संघर्ष सांगितला. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना शिवसैनिकांनी साथ दिल्यामुळेच निवडून आलो होतो, असे त्यांनी सांगितले. पुरुषोत्तम बरडे यांनी नवीन मंडळी आल्यामुळे गट तयार न होता फक्त ठाकरे यांचा गट अशीच सेनेची ओळख रहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. निवडणुकीत कोणी गद्दारी केल्यास आमची हाडे अजून मजबूत आहेत, असा इशारा देतानाच जिल्ह्याच्या सर्व जागा लढविण्याची तयारी ठेवा, असे सूचित केले. यावेळी संभाजी शिंदे, संजना घाडी यांनी मत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. शेवटी शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले यांनी आभार मानले.
तर बंडखोरी: नारायण पाटील
कार्यक्रमाच्या प्रारंभी सेनेत नव्याने दाखल झालेल्या रश्मी बागल यांचे स्वागत करताना आमदार नारायण पाटील एकटेच खाली बसून राहिले. त्यांना गुच्छ देण्यासाठी पुढे बोलाविल्यावर नको म्हणून त्यांनी हातानेच इशारा केला. त्यानंतर बोलताना आमदार पाटील यांनी पहिल्यांदा निवडणुकीला उभारल्यावर हा काय पैलवान आहे, याला मुंबई कुठे आहे माहीत आहे काय, अशी टर उडविण्यात आली. संघर्ष करून आमदार झालो. त्यामुळे करमाळ्यामध्ये आम्हाला दोघांनाही उमेदवारी देऊ नये. दोघांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास बंडखोरी निश्चित आहे, त्यामुळे सावंत बंधूंपैकी एकाने निवडणूक लढवावी, पुढच्या वेळेस बागल यांना संधी देण्यास हरकत नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.
माझे जुने चिमटे विसरुन जा : सोपल
- माजी आमदार दिलीप सोपल यांनी दरवेळेस नवीन चिन्ह घेतल्यावरच निवडून आलो, असे सांगितले. एकदा एकाच चिन्हावर दुसºयांदा निवडणूक लढविल्यावर पराभव झाला. शिवसेनेनेच मला मंत्री केले. त्यावेळी मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खूप जवळ गेलो होतो. त्यामुळे हितचिंतकांना पाहवलं नाही. इच्छा असूनही मला सेनेकडून तिकीट मिळू दिलं नाही. सेनेने मोठे केलेले सोडून गेल्याने मलाच स्पर्धा नाही. यापूर्वी विरोधात असताना काढलेले चिमटे विसरून जा, असा सल्लाही त्यांनी दिला.
उमेदवार पक्षप्रमुख ठरवतील: सावंत
- शिवसेनेत प्रवेश देताना कोणालाही उमेदवारीचा शब्द दिलेला नाही. त्यामुळे आताच यावर चर्चा करणे योग्य होणार नाही. कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्षप्रमुख ठाकरे ठरवतील, असे स्पष्टीकरण प्रा. शिवाजी सावंत यांनी दिले. निष्ठेने काम करणाºया शिवसैनिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मेळाव्यास जलसंधारणमंत्री तानाजी सावंत उपस्थित राहू शकले नाहीत. मेळावा तीन तास उशिराने सुरू झाला.
माझ्यामुळे कोणाची अडचण नाही: माने
- शिवसेनेत प्रवेश करताना मी कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारी मागितलेली नाही. महेश कोठे यांची मी अडचण करणार नाही, असे स्पष्टीकरण माजी आमदार दिलीप माने यांनी दिले. माझ्या सेनाप्रवेशामुळे उलट-सुलट बातम्या आल्या. त्यामुळे सोशल मीडियावरच्या पोस्ट पाहणे मी सोडून दिले आहे. माझं डोकं काँग्रेसचं होतं, पण चाल सेनेचीच होती, हे लक्षात घ्या. काँग्रेसच्या अनुभवाचा पक्षवाढीसाठी उपयोग करणार आहे. त्यामुळे त्यांच्या आघाडीचे काय व्हायचे ते होवो, युतीवर आपण बोलू नये, तो पक्षप्रमुखांचा अधिकार आहे.
कार्यकर्त्यांना गृहीत धरणे ही चूक: बागल
- कार्यकर्त्यांना गृहीत धरणे ही राजकारणात मोठी चूक असते. गेली १३ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनिष्ठपणे काम केलं, पण तिथे न्याय मिळाला नाही, अशी तक्रार आता मी करणार नाही. लोकसभेला राष्ट्रवादीला लीड दिला, पण तो आता भूतकाळ असेल. इतिहासात आपण आमने-सामने लढलो. ती काही नूरा कुस्ती नव्हती, असे स्पष्टीकरण रश्मी बागल यांनी यावेळी दिले.