सोशल मीडियाच्या माध्यमातून हरविलेली बहीण मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:57 AM2018-12-24T10:57:28+5:302018-12-24T10:58:59+5:30
उपळाई बुद्रुक : सोशल मीडियाचा वापर योग्यपणे केला तर त्याचा उपयोग समाजकार्यासाठी कसा होऊ शकतो, याचा प्रत्यय येथे एका ...
उपळाई बुद्रुक : सोशल मीडियाचा वापर योग्यपणे केला तर त्याचा उपयोग समाजकार्यासाठी कसा होऊ शकतो, याचा प्रत्यय येथे एका घटनेतून आला. भावाला भेटण्यासाठी आलेली बहीण चुकीने भलत्याच गावात पोहोचली. मात्र जागृतपणा दाखवून येथील बबली टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक फैयाज रज्जाक आतार यांनी मोबाईलवरून संपर्क साधून बहीण-भावाची भेट घडवून दिली.
घटना अशी, सांगवी तालुका बारामती येथून संबंधित महिला फलटण येथे बायपास सर्जरीसाठी दाखल असलेल्या आपल्या भावाला पाहण्यासाठी गेल्या होत्या. भावाला भेटून आपल्या गावाकडे माघारी परत जाताना त्या चुकून टेंभुर्णीकडे आल्या. अनोळखी गावात पोहोचल्यावर त्या भांबावून गेल्या. अशातच जवळचे पैसेही संपलेले. यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. त्या या परिसरात एकट्याच फिरत होत्या.
दरम्यान, बाळासाहेब शंकर जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बहीण हरवल्याची माहिती फोटोसह पोस्ट केली. ही माहिती व्हायरल होत फैयाज आतार यांच्यापर्यंत पोहोचली. फैयाज यांचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय आहे. २२ डिसेंबरला टेंभुर्णी येथे रात्री १० वाजता बसस्थानकासमोर प्रवासी घेण्यासाठी ते बंडू माने या मित्रासह थांबले होते.
यावेळी सोशल मीडियावर आलेल्या छायाचित्रातील एक महिला त्यांना दिसली. त्यामुळे त्यांचे कुतूहल जागृत झाले. संबंधित महिला आणि छायाचित्रातील महिला एकच असल्याची खात्री पटताच त्यांनी त्या महिलेची विचारपूस करून धीर दिला. खायला दिले व भावाशी संपर्क साधला. आपली बहीण टेंभुर्णीत सापडल्याचे कळताच बाळासाहेब जगताप यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. याच रात्री १२ वाजता ते आपल्या नातेवाईकांसह पोहोचले. त्यानंतर फैयाज यांनी बाळासाहेब जगताप यांची बहिणीशी भेट घालून दिली. डोळ्यात आनंदाश्रु दाटले. सोशल मीडियामुळेच हे सत्कार्य आपण करू शकलो, याचा आनंद फैयाज यांनी व्यक्त केला.