राम मंदिराबाबतची पुनर्विचार याचिका राष्ट्रीय बंधुभावास मारक ठरेल : देवकीनंदन महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:00 PM2019-12-10T12:00:37+5:302019-12-10T12:03:21+5:30
शालेय पाठ्यपुस्तकात रामायण, भगवद्गीतेचा समावेश करण्याची मागणी
सोलापूर : भारताची परंपरा राम आणि श्री कृष्णापासून सुरू होते़ अयोध्येत राम मंदिर व्हावे ही तर सर्व भारतीयांची इच्छा आहे़ यावर सुप्रीम कोर्टानेही निकाल दिला आहे़ राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव यास प्रेरक ठरणार आहे़ असे असताना काहींनी मंदिर बांधकामाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे़ हे चुकीचे आहे़ त्यांची याचिका राष्ट्रीय बंधुभावास मारक ठरू शकते़ त्यामुळे त्यांनी याचिका मागे घेऊन राम मंदिर बांधकामास सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्री देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.
श्री ठाकूर महाराज यांचे सोलापुरात भागवत कथा प्रवचन सुरू आहे़ त्यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी विशेष बातचीत केली. ते म्हणाले, आपली पिढी इंग्लंड आणि अमेरिकेला फॉलो करत आहे़ त्यांची संस्कृती वेगळी आहे आणि आपली संस्कृती वेगळी आहे़ त्यांच्या संस्कृतीचा बेस वेगळ्या धर्मावर आधारित आहे आणि आपली संस्कृती राम आणि कृष्णाच्या परंपरेवर आधारित आहे़ अशा दोन्ही धर्मांचे संमिश्रण होणे हे काही चांगले नाही़ अशा चुकीच्या परंपरेला फॉलो होत असल्याने आजची पिढी दिशाहीन बनली आहे.
भारतीय संस्कृती ही ऋषी-मुनींच्या विचारांवर आधारित आहे़ त्यांचे विचार आणि संस्कृती ही माणुसकी जपणारी आहे़ आजच्या संस्कृतीत माणुसकी कुठे आहे़ हैदराबाद येथे झालेला अत्याचार किती अमानवी आहे़ याचे विचार देखील करवत नाही़ आपण कुठे चाललो आहोत, याचा विचार होणे गरजेचे आहे़ धर्म मूल्याचे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे़ त्याशिवाय पर्याय नाही़ राजकीय नेत्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा़
...तर स्त्रियांचा योग्य सन्मान करतील
- ठाकूर महाराज म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या नेत्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्था धर्म आणि न्यायप्रिय न ठेवता व्यावहारिक बनवली़ अशा शिक्षणामुळेच अनेक पिढ्या व्यावहारिक बनल्या़ त्यांना सामाजिक भान राहिलेले नाही़ अशा व्यावहारिक शिक्षण व्यवस्थेत महिलांचा सन्मान कुठे आहे़ भारताची परंपरा राम आणि कृष्णापासून सुरु होते़ त्यांचे आदर्श विचार आणि आचरण आपल्या शिक्षण व्यवस्थेत का नको़ शालेय जीवनापासून प्रभू राम आणि श्रीकृष्णाच्या विचारांचा समावेश केल्यास भविष्यातील पिढ्या स्त्रियांचा योग्य सन्मान करतील. त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकात रामायण आणि भगवद्गीतेचा समावेश करा़ धर्माचे विचार आणि मूल्य हे शिक्षणाद्वारे आत्मसात करायला लावा, म्हणजे ते स्त्रियांचा योग्य सन्मान करतील़़ त्यांना सामाजिक भान देखील येईल़ जबाबदारीची जाणीव राहील़