राज्यात २४ हजार ९६२ मेगावॅट विजेच्या मागणीचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:29 PM2018-10-23T16:29:45+5:302018-10-23T16:31:21+5:30
सोलापूर : आॅक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला असून सोमवारी, दि. २२ रोजी तब्बल २४९६२ मेगावॉट ...
सोलापूर : आॅक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला असून सोमवारी, दि. २२ रोजी तब्बल २४९६२ मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली. यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यात म्हणजे महावितरणच्या कार्यक्षेत्रात २१५८० मेगावॉट तर मुंबईमध्ये ३३८२ मेगावॉट विजेची मागणी होती.
सध्या आॅक्टोबर हिटच्या झळांनी विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. उन्हाळ्यातील मागणीपेक्षाही आॅक्टोबर महिन्यात विजेची अधिक मागणी नोंदविण्यात येत आहे. राज्यात गेल्या १६ आॅक्टोबरला २४९२२ मेगावॅट तर महावितरणकडे २१५४२ मेगावॉट, १७ आॅक्टोबरला २४६८७ मेगावॉट तर महावितरणकडे २१२२३ मेगावॉट विजेची मागणी होती. त्यानंतर दि. २२ आॅक्टोबरला ही मागणी २४९६२ मेगावॉटवर गेली. आजवरची ही उच्चांकी मागणी आहे.
याच दिवशी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात २१५८० मेगावॉट विजेची मागणी होती. एकदम विजेची मागणी वाढल्यामुळे योग्य नियोजनाद्वारे महावितरणकडून २०६३० मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला. राज्यात ज्या वाहिन्यांवर सर्वाधिक वीजहानी आहे, वीजदेयकांची वसुली अत्यंक कमी आहे अशा जी-१ ते जी-३ गटातील वाहिन्यांवर ९५० मेगावॉट विजेचे भारनियमन करण्यात आले.
राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे गेल्या तीन वर्षांपासून विविध योजनांच्या माध्यमातून सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय महावितरणने २०६३० मेगावॉट विजेचा पुरवठा केला तर महापारेषणने २४०१२ मेगावॉट वीज पारेषीत केली.