'डिसले गुरुजींचा 3 वर्षांचा पगार वसुल करा', मुख्याध्यापकांनाही बजावली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:24 AM2022-02-04T11:24:08+5:302022-02-04T11:25:08+5:30
रणजीतसिंह डिसले यांना जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे प्रतिनियुक्ती देण्यात आली. पण, या संस्थेकडे त्यांनी काम केले नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सोलापूर - ग्लोबल टिचर पुरस्कारविजेते रणजीतसिंह डिसले गुरुजी यांनी तीन वर्षे नोकरीवर हजर न राहता घेतलेले वेतन त्यांच्याकडून वसुल करावे, अशी मागणी मुख्याध्यापक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सुभाष माने, यांनी गुरुवारी केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे त्यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली असून डिसले गुरुजींना 3 वर्षांचे वेतन दिलेच कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
रणजीतसिंह डिसले यांना जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे प्रतिनियुक्ती देण्यात आली. पण, या संस्थेकडे त्यांनी काम केले नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या संस्थेकडून कार्यमुक्त झाल्यानंतर ते जिल्हा परिषदेच्या शाळेवर नाममात्र पगार काढण्यापुरते हजर झाले. जिल्हा परिषद शाळा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणेसाठी त्यांनी कोणतेच काम केले नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. असे असताना त्यांना 3 वर्षे वेतन कोणत्या आधारावर देण्यात आले, याची चौकशी करुन हे वेतन परत घ्यावे, अशी मागणी सुभाष माने यांनी केली आहे. तसेच, मुख्याध्यापकांच्या प्रश्नाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे बैठक लावण्यात आली आहे. या बैठकीत डिसले यांना परदेशात जाण्यासाठी परवानगी द्या, असे आदेश सीईओंना कोणत्या आधारावर देण्यात आले. याबाबतचा प्रश्नही उपस्थित करणार असल्याचं माने यांनी म्हटलं आहे.
मुख्याध्यापकांना नोटीस
डिसले गुरुजींचा पगार कोणत्या आधारावर काढला, याबाबत परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी सांगितले.