एका दिवसात केली दीड कोटींची वीजबील वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:27 AM2021-02-25T04:27:47+5:302021-02-25T04:27:47+5:30
लॉकडाऊन काळात तीन महिन्यापर्यंत वीज बिल ग्राहकांपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना ज्या पद्धतीने सामान्य ...
लॉकडाऊन काळात तीन महिन्यापर्यंत वीज बिल ग्राहकांपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना ज्या पद्धतीने सामान्य माणसाच्या दारावर धडकल्या, त्याप्रमाणे वीजबिल माफीची घोषणा देखील अपेक्षित होती, पण तसे झाले नाही. अनेकांची वीजबिल भरणा करावा लागणार नाही अशीच अपेक्षा असल्याने त्यांनी वीज बिल भरले नाही. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी जेव्हा थकीत वीज बिलापोटी वीज कनेक्शन कट करण्यासाठी दारात पोहताच ग्राहकांनी टप्याटप्याने बील भरतो पण वीज कनेक्शन तोडू नका अशी विनंती केली.
कोट्यावधी रुपयांच्या थकीत वीज बिलापोटी वीज कनेक्शन कापण्याशिवाय पर्याय नसल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी देखील ग्राहकांच्या विनंतीला भीक घातली नाही. अखेर मंगळवारी सांगोला शहरातील २२३ थकीत ग्राहकांचे वीज कनेक्शन कापल्याने वीजेविना रात्र अंधारात काढावी लागली.
जानेवारी अखेरीस सांगोला शहरात ४ कोटी ५० लाख रुपये तर ग्रामीण भागाची १२ कोटी अशी एकूण घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांची सुमारे १६ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे.
ग्राहकांनी स्वत: केला २४ लाखांचा वीज बिल भरणा
मंगळवारी थकीत वीजबील असणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केल्याने अनेक ग्राहकांनी वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या सांगोला येथील कार्यालयाकडे धाव घेतली. वीज कनेक्शन कट केलेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांनी एकाच दिवशी सुमारे २४ लाख रुपयांचा वीज बिलाचा भरणा केला. शासनाने कोरोना काळातील परिस्थिती लक्षात घेऊन वीज बिल माफ करावे अन्यथा कमी तरी करावे, अशी ग्राहकांनी केली आहे.
उद्दीिष्ठपूर्तीकडे वाटचाल
महावितरणच्या बारामती परिमंडळ विभागाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता पडळकर, प्रभारी कार्यकारी अभियंता शिंदे, उपविभागीय अभियंता आनंद पवार, सांगोला शहर सहा.अभियंता अमित शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवस-एक-उपविभाग-एक कोटी रुपये थकबाकी वसुली या विशेष मोहिमेंतर्गत सांगोला तालुक्यात उद्दीष्टपूर्ती करीत १ कोटी ६८ लाख रूपये वीज बिलाची वसुली केली.