सोलापूर शहरातील आरोग्य तपासणीसाठी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:58 PM2020-06-13T12:58:31+5:302020-06-13T13:00:30+5:30
विद्यार्थ्यांना नेमणूक रद्द करण्याच्या मागणीसाठी महापालिकेला विनंती : महाविद्यालयाने हात वर केल्याबद्दल पालकांना खंत
सोलापूर : नर्सिंग महाविद्यालयात शिकणाºया विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीसाठी महापालिकेतर्फे नेमण्यात आले आहे. या कामासाठी विद्यार्थ्यांना नेमू नये, अशी विनंती पालकांतर्फे करण्यात आली आहे. यासंबंधी शहरातील नर्सिंग महाविद्यालयांनी हात वर केल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे.
शहरातील खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाºया ३०० विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी व अप्रेंटिसशिपसाठी बोलावण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांकडून शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. गरज पडल्यास नागरिकांच्या छातीचा एक्स-रे काढून कोविड व न्यूमोनिया आजार तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील नर्सिंग प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. सध्या या विद्यार्थ्यांकडून काम सुरू करण्यात आले असून, शहरातील विविध आरोग्य केंद्रात ते काम करत आहेत.
या विरोधात काही पालकांनी महापालिकेकडे धाव घेतली. आमची मुले लहान आहेत, त्यांना जोखमीचे काम देऊ नका. त्यांचा शिक्षणाचा कालावधी देखील पूर्ण झालेला नाही, हे योग्य नसल्याची विनंती पालकांनी केली.
काम करणाºया मुलांना फक्त सॅनिटायझर देण्यात आले आहे. मास्क देखील पुरविले जात नाहीत. तरीदेखील हे नवखे विद्यार्थी काम करत आहेत. बहुतांश विद्यार्थी हे भीतीपोटी काम करत आहेत. आपण काम केले नाही तर महाविद्यालयातून आपल्याला निलंबित केले जाईल, अशी त्यांना भीती असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे शुल्क भरण्यास उशीर झाल्यास त्यांच्यातर्फे फोन करून विचारणा केली जाते, आता विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले नसले तरी त्यांना कामाला जुंपले जात आहे. पालकांची साधी बैठक देखील महाविद्यालयांनी घेतली नाही. या विषयी विचारले असता महाविद्यालये महापालिकेला विचारा, असे सांगत आहेत.
-पालक
विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सर्व साधने उपलब्ध करून देऊ. जे विद्यार्थी परगावी राहतात त्यांच्या राहण्याची सुविधा करून दिली जात आहे. जे शहरात राहतात त्यांना त्यांच्या घराजवळ काम देण्यात येणार आहे. कोरोना योद्धे म्हणून त्यांना विम्याचे संरक्षणही मिळेल.
- पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महानगरपालिका