मार्चनंतर सोलापूर महापालिकेत ४ हजार पदांसाठी नोकर भरती, एजन्सीची झाली नेमणूक
By Appasaheb.patil | Published: February 2, 2023 04:32 PM2023-02-02T16:32:57+5:302023-02-02T16:33:54+5:30
प्रक्रिया अंतिम टप्प्यात; एजन्सीची झाली नेमणूक, सेवा ज्येष्ठता यादीही मंजूर
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: आकृती बंधानुसार सोलापूर महानगरपालिकेतील ५४ विभागांत ४ हजारांहून अधिक पदासाठी नोकर भरती होणार आहे. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मार्चनंतर भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. नोकर भरतीसाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून सेवा ज्येष्ठता यादीही मंजूर झाली आहे. आता फक्त रोस्टर मंजुरीसाठी पाठविले आहे, तेही लवकरच मंजूर होईल, असे सांगण्यात आले.
सोलापूर महानगरपालिकेच्या मंजूर आकृती बंधानुसार एकूण ४६१२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी विविध विभागात व विविध संवर्गातील एकूण १ हजार १२५ जागा गेल्या १५-२० वर्षांपासून रिक्त आहेत. विविध संवर्गातील रिक्त पदांपैकी अ वर्गात ७७ पदे, ब वर्गातील १७७ पदे, क वर्गातील ५४७ पदे आणि ड वर्गातील ३१० पदे एकूण १ हजार १११ पदे रिक्त असून दरवर्षी सेवानिवृतीने, मृत्यूमुळे, स्वेच्छा निवृत्तीमुळे कामगार, कर्मचारी अधिकारी यांच्या जागा रिक्त होतच आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने भरतीची प्रक्रिया राबविण्याबाबत राज्यातील सर्व महानगरपालिकांना सूचना केलेल्या आहेत. वेळोवेळी बैठका व परिपत्रकातून भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना करण्यात येत आहे.
टीसीएस एजन्सी राबविणार भरती प्रक्रिया..
सोलापूर महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेसाठी शासनाने दिलेल्या सूचनेनुसार टीसीएस एजन्सी संपूर्ण भरती प्रक्रिया राबविणार आहे. कोणत्या पदासाठी कोणती पात्रता याचाही उल्लेख भरती प्रक्रियेच्या जाहिरातीत करण्यात येणार आहे. मार्चनंतर भरती प्रक्रिया होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
५३ प्रकारच्या संवर्गातील पदे भरणार
पाणीपुरवठा, आरोग्य, नगर रचना, अग्निशामक दल, मालमत्ता कर यांसह अन्य विभागातील ५२ प्रकारच्या संवर्गातील भरती होणार आहे. यात शिपाईपासून ते वरिष्ठ अधिकारी, क्लार्क, इंजिनीअर आदी विविध पदे भरण्यात येणार आहेत.
नाेकर भरती संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण होत आहे. आकृतीबंध, सेवा ज्येष्ठता यादी, एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. या संदर्भात दोन बैठकाही झाल्या आहेत. रोस्टर मंजुरीच्या प्रतीक्षेत असून तेही लवकरच मंजूर होईल. त्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होईल. - शीतल तेली-उगले, आयुक्त, सोलापूर महानगरपालिका.