आषाढी यात्रेतील संचारबंदीचा कालावधी कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:47+5:302021-07-07T04:27:47+5:30
पंढरपूर : पंढरपूर शहरात व शहराच्या आजूबाजूच्या गावात जास्त दिवस संचारबंदी ठेवल्यास सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत ...
पंढरपूर : पंढरपूर शहरात व शहराच्या आजूबाजूच्या गावात जास्त दिवस संचारबंदी ठेवल्यास सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत होऊ शकते. यामुळे आषाढी यात्रेदरम्यान तीन दिवसच संचारबंदी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.
कारोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यावर प्रतिबंध घालताना जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व परिसरातील नऊ गावांमध्ये १७ जुलै ते २१ जुलै २०२१ दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी जाहीर केली आहे. यामुळे पंढरपुरातील सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे. वास्तविक, पंढरपुरात येणाऱ्या सर्वच मार्गांवर त्रिस्तरीय नाकाबंदी केली जाणार आहे. तीन हजार पोलिसांमार्फत बंदोबस्त करण्याचे नियोजन शासनामार्फत केले आहे. तसेच एस.टी. महामंडळाच्या बसही या काळात बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व परिसरात खाजगी वाहने अथवा बसने भाविक येण्याची शक्यताच नाही.
तीर्थक्षेत्र पंढरपूर हे चार यात्रांवर जगणारे गाव आहे. मागील दीड वर्षापासून सतत संचारबंदी व वर्षभरातील यात्रा रद्द झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुन्हा एकदा शासनाने आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात येण्यासाठी चौफेर नाकाबंदी केली. याच काळात पंढरपूर शहर व परिसरातील गावामध्ये संचारबंदी करण्याचे निर्देश काढणे हे येथील अर्थकारणासाठी अयोग्य आहे. त्यामुळे सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत होणार आहे.
-----
तीन दिवस राहावी संचारबंदी
अशा परिस्थितीत याचा फटका लहान-मोठा व्यापारी वर्ग, कष्टकरी मजूर, प्रासादिक भांडार, रिक्षा-टांगेवाले, मजूर, भाजी विक्रेते व शेतकरी यांना बसणार आहे. यामुळे तीन दिवसच संचारबंदी असावी, असे पत्र अजित पवार यांना दिले असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.