अंगातली उष्णता जाण्यासाठी ‘चाय कम, मठ्ठा जादा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 05:08 PM2019-03-25T17:08:49+5:302019-03-25T17:10:40+5:30

आला उन्हाळा... : उत्तम आरोग्यासाठी मलई ताकाला अधिक मागणी

To reduce heat, 'tea less, more than enough' | अंगातली उष्णता जाण्यासाठी ‘चाय कम, मठ्ठा जादा’

अंगातली उष्णता जाण्यासाठी ‘चाय कम, मठ्ठा जादा’

Next
ठळक मुद्देताकापासून मठ्ठा तयार करण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरा पावडर अन् मीठ हे साहित्य लागतेकाही फॅमिली रेस्टॉरंटमध्ये रिकाम्या झालेल्या मिनरल वॉटरच्या बाटल्यांमध्ये ताक अथवा मठ्ठाही दिला जातो

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : आहारशास्त्रात ताकाला विशेष महत्त्व आहे. रखरखत्या उन्हात फिरताना दिवसभरात एक-दोन वेळा ताक पिणे शरीरासाठी आवश्यक असते. म्हणूनच उन्हाळ्यातले चार महिने ताक अथवा मठ्ठा पिण्यावर ग्राहकांचा भर असतो. विशेष म्हणजे म्हशीच्या ७ फॅट दुधापासून दही अन् त्यापासून तयार करण्यात आलेल्या मलई ताकाला चांगलीच मागणी असते. वर्दळीच्या ठिकाणी ताक, मठ्ठा विकणाºया फेरीवाल्यांकडे दोन-तीन ग्लास पिणारेही ग्राहक दिसून येतात.

उन्हाळा आला की काही आजारांना आमंत्रण मिळते. उन्हात अधिक वेळ फिरल्यावर चक्कर येण्याचे प्रकार घडत असतात. अंगातली उष्णता वाढल्यावर जे आजार उद्भवतात, ते उद्भवू नये म्हणून ताक पिणे हा सर्वोत्तम पर्याय असतो. एरव्ही चहा घेणारे काही ग्राहक उन्हाळ्यात मात्र ताक अथवा मठ्ठा पिणे पसंत करतात.

फेब्रुवारी महिना उजाडला की उन्हाळ्याची चाहूल लागते. या महिन्यात उन्हाची तेवढी तीव्रता भासत नाही. मार्च आणि त्यानंतर पुढील एप्रिल आणि मे हे तीन महिने मात्र कसे जातात, हीच चिंता असते.उन्हापासून बचाव करण्यासाठी सनकोट, टोप्या, स्कार्फ, गॉगल्स वापरण्याचा जसा कल असतो. अगदी तसाच कल उन्हाळ्यातल्या आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी ताक अन् मठ्ठा पिण्यावरही बहुतांश ग्राहकांचा कल असतो. 

गुरुनानक नगरलगत असलेल्या उजनी कॉलनीतील एका दुग्धालयाचे शिवाजी व्हनमाने म्हणाले, उन्हाळ्यातले चार महिने ताक पिणाºयांची संख्या अधिक असते. आमच्या येथून दररोज १६० लिटर ताक आणि ५० लिटर मठ्ठा विकला जातो. म्हशीच्या ७ फॅट दुधापासून दही आणि त्या दह्यापासून जे ताक तयार होते, त्या मलई ताकास चांगलीच मागणी असते. या ताकाची चव चाखल्यावर ग्राहक पार्सल घेऊन घरी नेतात. हे ताक ५० रुपये लिटर असून, कामानिमित्त बाहेर पडलेले व्यापारी, नोकरदार सकाळी आणि सायंकाळी येऊन ताक पिऊनच जातात. साधारणपणे सोलापुरातील हॉटेल्स आणि खास ताक अन् मठ्ठा विक्रेत्यांचा विचार करता त्यांची दररोज २५ हजार लिटर विक्री होत असल्याचे दूध डेअरी चालकांना बोलते केले असता समजले. 

असा बनविला जातो मठ्ठा !

  • - ताकापासून मठ्ठा तयार करण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरा पावडर अन् मीठ हे साहित्य लागते. घुसळलेल्या ताकात हे साहित्य टाकून ते एकजीव केले जाते. त्यानंतरच मठ्ठा तयार होतो. काही फॅमिली रेस्टॉरंटमध्ये रिकाम्या झालेल्या मिनरल वॉटरच्या बाटल्यांमध्ये ताक अथवा मठ्ठाही दिला जातो. 

शिवा मठ्ठेवाल्याची २० वर्षांपासून सेवा
- शिवा सिद्राम भासकर हे गेल्या २० वर्षांपासून सायकलवरुन मठ्ठा विकण्याचे काम करतात. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, परिसरातील बँकांमध्ये येणारी मंडळी उन्हाळ्यातले चार महिने हमखास शिवा मठ्ठेवाल्याकडे येतात. ५० पैसे एक ग्लास असताना शिवा आजही ग्राहकांना सेवा देत असतात. त्यांच्याकडून दररोज १० कॅन्ड (एका कॅन्डमध्ये ४० लिटर) म्हणजे ४०० लिटर मठ्ठा विकला जातो. 

आमच्याकडे खास मलई ताक आणि मठ्ठा पिण्यासाठी येणाºया ग्राहकांची विशेष काळजी घेतो. त्यांच्या आरोग्याचा विचार करूनच ताक आणि मठ्ठा तयार केला जातो. पार्सल घेऊन घरी ताक अन् मठ्ठा घेऊन जाणाºया ग्राहकांची संख्या अधिक आहे.
- शिवाजी व्हनमाने
दूध डेअरी चालक.

Web Title: To reduce heat, 'tea less, more than enough'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.