कोरोना रुग्णांची संख्या कमी; सोलापूर जिल्ह्यात १२ हजार व्यक्ती होम क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 12:20 PM2020-12-07T12:20:09+5:302020-12-07T12:20:13+5:30
रुग्णशोेध मोहीम : ३ लाखांवर व्यक्तींचे क्वारंटाईन पूर्ण
सोलापूर : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. शहराच्या तुलनेने ग्रामीण भागात रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच जिल्ह्यात एकूण १२ हजार १५३ व्यक्ती या होम क्वारंटाईन आहेत.
जिल्ह्यातील होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे प्रशासनासाठी कठीण जात आहे. होम क्वारंटाईन व्यक्तीच्या हातावर शिक्का मारला जात असल्याने त्यांची होम क्वारंटाईन असल्याची ओळख पटवणे शक्य होत आहे. या व्यक्ती घराबाहेर आल्यानंतर त्यांना पाहून परिसरातील नागरिक आरोग्य विभागाकडे फोन करून त्यांच्याविषयी तक्रारी देत आहेत. यावरुन आरोग्य विभाग कारवाई करत आहे. या व्यतिरिक्त कारवाई केल्याचे क्वचितच दिसून आले आहे. जिल्ह्यातील तीन लाख १३ हजार ७९९ तर शहरातील २८ हजार ७१४ व्यक्तींनी १४ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे.
सोमवारपासून मोहीम
जिल्हा परिषदेकडून माझे गाव कोरोनामुक्त गाव मोहिमेस सोमवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात तलाठी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे. आशा वर्कर व आरोग्यसेवक हे समितीची मदत करतील. यासोबतच गावातील दुकानदार, भाजी मंडई, तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
पूर्ण अलगीकरण नाहीच...
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे संपूर्ण अलगीकरण झाल्याचे दिसत नाही. या व्यक्ती डिस्टन्स पाळत नाहीत. यांच्यासाठी केलेल्या स्वयंपाकाची भांडी, त्यांचे कपडे, अंथरूण, प्रसाधनगृह यांचे विलगीकरण होत नाही. घरातील इतर लोकही त्याचा बराचसा वापर करतात. रुग्ण पाच-सहा दिवसांनंतर घरात व परिसरात वावरताना दिसतो. याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी गाव पातळीवर समीती नियुक्ती करण्यात आली आहे. पॉझीटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्याची जबाबदारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिली आहे. रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात येईल.
- डॉ. शीतलकुमार जाधव,
जिल्हा आरोग्यअधिकारी