स्वखर्चाने मतदान केंद्रावर जाण्यास शिक्षकांचा नकार; शिक्षक भारती संघटनेने घेतली जिल्हाधिऱ्यांची भेट
By Appasaheb.patil | Published: April 29, 2024 08:04 PM2024-04-29T20:04:33+5:302024-04-29T20:04:46+5:30
कर्मचाऱ्यांच्या स्थानिक विधानसभा मतदार संघातून इतर विधानसभा मतदारसंघात त्यांना ड्युटी बजावावी लागणार आहे.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व माढा या दोन मतदार संघात ७ मे २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदानाकरिता मतदान अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या मतदान कार्यासाठी ड्युटी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या स्थानिक विधानसभा मतदार संघातून इतर विधानसभा मतदारसंघात त्यांना ड्युटी बजावावी लागणार आहे.
६ मे २०२४ रोजी कर्मचाऱ्यांना नियुक्त केलेल्या विधानसभा मतदारसंघात सकाळी ८ वाजता स्वखर्चाने व स्वतःच्या वाहनाने उपस्थित राहण्याविषयी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या अगोदरच्या सर्व निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांना एसटी बसने सुरक्षित व वेळेवर निवडणूकीसाठी नियुक्त असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात घेऊन जाण्यात येत होते. यावेळी स्वतःच्या किंवा खाजगी वाहनांच्या मदतीने नियुक्त मतदारसंघात येण्यास सांगितल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ६ मे रोजी सकाळी ८ वाजता नियुक्त केलेल्या विधानसभा मतदारसंघात जायचे असल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ होणार आहे तसेच निवडणूक कामाच्या विशिष्ट ताणतणावामुळे प्रवासादरम्यान सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे.
जिल्ह्यातील खाजगी शिक्षकांच्या मागणीवरून शिक्षक भारती सोलापूर यांच्यावतीने जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास कर्मचाऱ्यांना प्रवासाकरिता शासनाच्या एसटी बस ची सुविधा पूर्वीप्रमाणे उपलब्ध करून देण्याविषयी निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, उपाध्यक्ष रियाजअहमद अत्तार, शाहू बाबर, शशि पाटील, अमोल तावसकर, देवदत्त मेटकरी, नितीन रुपनर, शरद पवार, मायाप्पा हाके आदी पदाधिकारी उपस्थित होते.