रॅगिंगबाबत ‘मे’मध्येच दिली होती माहिती!

By admin | Published: December 11, 2014 12:16 AM2014-12-11T00:16:49+5:302014-12-11T00:32:53+5:30

‘नवोदय’चा हलगर्जीपणा : वडिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Regarding the ragging 'M'ay' only information! | रॅगिंगबाबत ‘मे’मध्येच दिली होती माहिती!

रॅगिंगबाबत ‘मे’मध्येच दिली होती माहिती!

Next

सांगली : पलूस येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी सचिनकुमार लालासाहेब जावीर याच्या मृत्यू प्रकरणाने आज, बुधवारी वेगळे वळण घेतले. सचिनने सदनप्रभारी बी. आर. खेडकर यांना लिहून ठेवलेली चिठ्ठी मे महिन्यात त्याच्या दप्तरात सापडल्यानंतर त्याच्या वडिलांनी शिक्षकांना वारंवार रॅगिंगबाबत माहिती दिली होती, तरीही शाळेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे आज उघड झाले. शाळेने सात महिन्यांत कोणत्याही हालचाली न केल्यानेच सचिनचा बळी गेल्याचे दिसून आले असून, त्याच्या वडिलांनी आज जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांकडे धाव घेऊन सखोल चौकशीचे साकडे घातले.
‘नवोदय’मध्ये दहावीत शिकणाऱ्या सचिनचा शुक्रवारी मृत्यू झाला. वसतिगृहाच्या आवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, त्याने आत्महत्या केली नसून, त्याचा घातपात झाल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त करून काल पलूस पोलिसांत तक्रार दिली. तथापि, शाळेच्या प्राचार्यांनी त्याने अभ्यासाच्या ताणातून आत्महत्या केल्याचे सांगून, सचिनने लिहिलेली चिठ्ठी त्याचवेळी का दिली नाही, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर सचिनच्या वडिलांनी आज जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांना भेटून निवेदन दिले. या निवेदनासोबत त्यांनी सचिनने त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेली वसतिगृहात होणाऱ्या छळाबाबतची चिठ्ठीही दिली आहे.
सचिन हुशार नव्हता, हे शिक्षकांचे म्हणणे खोटे आहे. यापूर्वी प्रत्येक विषयात चांगले गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला आहे. जेव्हा तो शाळेतून सुटी घेऊन मे महिन्यात घरी आला, तेव्हा त्याच्या शाळेच्या बॅगेमध्ये खेडकर या शिक्षकांना देण्यासाठी लिहिलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये मोठ्या विद्यार्थ्यांकडून इतर मुलांचा छळ कसा करण्यात येतो, याची माहिती लिहिलेली आहे. याबाबत विद्यालयालाही माहिती दिली होती, मात्र त्यांनी दखल घेतली नाही.
शुक्रवारी सचिनने आत्महत्या केल्याचे कळविण्यात आले. जेव्हा आपण त्याचा मृतदेह पाहिला, तेव्हा त्याच्या गळ्याभोवती ओरखडाही नव्हता. त्याची जीभ बाहेर आलेली नव्हती. त्याच्या उजव्या पायातील अंगठ्याजवळ जखम दिसली. त्यामुळे ही आत्महत्या वाटत नाही. त्याच्या सहकाऱ्याला त्याने वही घेऊन येतो असे सांगून केवळ पंधरा मिनिटांत त्याने आत्महत्या केली, असे सांगितले जात आहे.
केवळ पंधरा मिनिटांत त्याने स्टुल, दोरी कोठून आणली? हा प्रकार संशयास्पद वाटतो. त्यामुळे त्याच्यावर रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसह यास जबाबदार असणाऱ्या प्राचार्य, शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी. याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


रॅगिंग करणाऱ्यांचा चिठ्ठीत उल्लेख
सचिनने मे महिन्यात खेडकर यांना देण्यासाठी लिहिलेल्या चिठ्ठीत रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे लिहिली आहेत. गरीब मुलांचा होणारा छळ थांबवावा, अशी मागणीही केली आहे. याबाबत कोणीही तुमच्याकडे थेट तक्रार करणार नाही, असेही त्याने या निनावी चिठ्ठीतून मांडले होते.
सात महिने शाळा प्रशासन गप्प कसे ?
मे महिन्यानंतर आपण शिक्षकांना व प्राचार्यांना रॅगिंगबाबत वारंवार कळवूनही त्या दोघांनी दुर्लक्ष केले. सचिनला त्रास नको म्हणूनच आपण ती चिठ्ठी प्राचार्यांकडे न देता स्वत:कडे ठेवली. दरम्यानच्या काळात आपण त्याला शाळेतून काढण्याची तयारी केली होती. मात्र, शिक्षकांनी व प्राचार्यांनी सचिनला त्रास होणार नाही याची हमी घेतली होती. त्यामुळे आपण विचार बदलला, असे सचिनच्या वडिलांनी पत्रकारांना सांगितले. सात महिन्यांपूर्वी याबाबत कळवूनही शाळेने काहीच हालचाल का केली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Web Title: Regarding the ragging 'M'ay' only information!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.