सोलापूर जिल्ह्यातील ५४२ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 06:10 PM2018-11-02T18:10:46+5:302018-11-02T18:21:54+5:30
सोलापूरसह राज्यातच बोगस सहकारी संस्थांचे पेव फुटले होते.
सोलापूर: कायमस्वरुपी बंद असलेल्या पिशवीतील ५४२ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सर्व संस्थांवर काही वर्षांपासून अवसायकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूरसह राज्यातच बोगस सहकारी संस्थांचे पेव फुटले होते. कागदावरील अनेक संस्थांचा ठावठिकाणाही लागत नव्हता. अशा पिशवीतील संस्थांची शोधमोहीम २०१५-१६ मध्ये तत्कालीन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी राबवली होती. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक संस्था या नोंदणीसाठी दिलेल्या पत्त्यावर सापडल्या नाहीत, अनेक संस्थांचे दप्तर आढळले नाही व अनेक संस्था बंद असल्याचे आढळले. अशा संस्थांवर अवसायकाची नियुक्ती करण्यात आली होती.
सोलापूर जिल्ह्यात ५४२ संस्थांवर अवसायक नियुक्त केले असून या संस्थांची कायमची नोंदणी येत्या मार्चपर्यंत रद्द करावयाची आहे. या ५४२ पैकी ४७ संस्थांवर १० पेक्षा अधिक वर्षापासून अवसायक नियुक्त आहेत. तर १६ संस्थांवर ६ पेक्षा अधिक वर्षांपासून अवसायक नियुक्त आहे. उर्वरित ४४९ सहकारी संस्थांवर तीन वर्षांपासून अवसायक नियुक्त आहेत.
१० पेक्षा अधिक वर्षे अवसायक असलेल्या ४७ संस्थांची नोंदणी आॅक्टोबरअखेर रद्द केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी सांगितले. १६ संस्थांची नोंदणी पुढील महिन्यात तर उर्वरित ४४९ संस्थांची नोंदणी जानेवारी-फेबु्रवारीमध्ये केली जाणार आहे.