रेल्वेच्या एक्स्प्रेस गाड्या नियमित; पण सवलतींसाठी सोलापूरचे प्रवासी वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 10:54 AM2021-11-24T10:54:33+5:302021-11-24T10:54:37+5:30
रेल्वे बोर्डाच्या आदेशाची मध्य रेल्वेच्या विभागांना प्रतीक्षा
सोलापूर : दीड वर्षानंतर रेल्वे मंत्रालयाने प्रवासी गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या गाड्या नियमित केल्या. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला. शिवाय तिकिटाच्या दरातही ३० टक्के कपात झाली. मात्र, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, खेळाडू, विद्यार्थी यासह अन्य सवलतींनी रेल्वे प्रवास करणारे प्रवासी मात्र अद्याप सवलतीमधील प्रवास करण्यासाठी प्रतीक्षेतच बसल्याचे दिसून येत आहेत.
कोरोना काळात विशेष गाड्यांचा दर्जा देऊन रेल्वेने प्रवासी गाड्या चालविल्या. मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. त्यामुळे देशभरातील निर्बंध ८० ते ९० टक्के घटविण्यात आल्याने प्रवाशांनी नियमित गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता १५ ऑक्टोबरपासून सोलापूर विभागातील ५३ गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या गाड्या नियमित केल्या. तिकीट दरातही कपात केली. मात्र, आता प्रवासी मासिक पास, ५४ घटकांना देण्यात येणारा सवलतीमधील प्रवास सुरू करण्याची मागणी सोलापूर विभागातील रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.
----------
विशेष दर्जा काढून त्या गाड्या नियमित केल्या. मात्र, अजूनही त्या गाड्यांतील प्रवाशांना पूर्वीप्रमाणे तिकिटात सवलत दिली जात नाही. तेव्हा सवलती पूर्वीप्रमाणे देऊन प्रवाशांना एक चांगला दिलासा द्यावा. विद्यार्थी, नोकरदारांना मासिक पास देण्याचीही कार्यवाही लवकरच सुरू करावी.
-संजय पाटील, प्रवासी सेवा संघ, सोलापूर
-------
कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या सवलती पुन्हा सुरू कराव्यात. एकीकडे एसटी सेवा बंद असताना सर्वाधिक प्रवासी हा रेल्वेकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे सवलती सुरू करण्याबरोबरच एसटी बस बंद काळात रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी.
-राजाभाऊ जाधव, रेल्वे प्रवासी संघटना, सोलापूर
---------
यांना मिळते रेल्वे प्रवासात सवलत...
भारतीय रेल्वे विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, पेशंट, दिव्यांग, शहिदांच्या पत्नी, खेळाडू, बेरोजगार, भारतीय सैन्य दलातील जवान, अशा ५४ घटकांतील प्रवाशांना रेल्वे तिकिटात सवलत देण्यात येते. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार रेल्वेच्या सर्व सवलती मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनच्या बेसिक रेल्वे तिकीट दरावर मिळतात. रेल्वेच्या सर्व प्रकारच्या सवलती केवळ स्टेशनवरील आरक्षण कार्यालयांमध्ये, बुकिंग कार्यलयांच्या काउंटवरच प्रदान केल्या जातात.
----------
सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या गाड्या...
- - सोलापूर-पुणे एक्स्प्रेस
- - सोलापूर-हसन एक्स्प्रेस
- - सोलापूर-मुंबई एक्स्प्रेस
- - मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेस
- - दादर-पंढरपूर एक्स्प्रेस
- - साईनगर-शिर्डी दादर एक्स्प्रेस
- - मुंबई-गदग एक्स्प्रेस
- -लातूर-मुंबई एक्स्प्रेस