निवडणूक काळात प्रशासकीय कार्यालयातील कामे नियमित सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:05 PM2019-09-23T13:05:51+5:302019-09-23T13:08:23+5:30
कोणीही बाऊ करू नये; जिल्हाधिकाºयांनी दिल्या अधिकाºयांना सूचना
सोलापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असली तरी प्रशासकीय कार्यालयातील व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत राहतील. कोणत्याही अधिकाºयांनी निवडणुकीचा बाऊ करू नये अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर आचारसंहितेचा अंमल सुरू झाला आहे. या काळात काय करावे व काय करू नये याची नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत राहतील. कामासाठी येणाºया नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकाºयांनी घ्यायची आहे.
निवडणूक कामासाठी घेण्यात येणाºया कर्मचाºयांना त्यांचे काम संपल्यानंतर मूळ ठिकाणच्या जबाबदाºया पार पाडावयाच्या आहेत. नियमित कामे व फायली प्रलंबित राहणार नाहीत, नागरिकांना विनाकारण हेलपाटे घालावे लागणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासकीय कामकाज नाही किंवा निवडणुकीचे काम आहे असे सांगून अनेक कार्यालये ओस पडलेली असतात. नागरिकांना संबंधित टेबलाचा कर्मचारी नेमका कुठे गेला आहे हे समजत नाही. त्याचबरोबर अनेक कर्मचारी आता निवडणूक संपल्यावर या अशी कारणे सांगताना दिसून येतात. दररोजच्या गरजेच्या कामांसाठी निवडणूक आचारसंहितेचा बाऊ करू नये असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भोसले यांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या कारवाया सुरू
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने ७ लोकांवर एमपीडीए (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याखाली स्थानबद्ध), ३६ जणांना तडीपार केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. शहरात ५६४ शस्त्र परवानाधारक आहेत, त्यांना शस्त्र जमा करण्यास सांगितले आहे. जिल्ह्यात ५२ टोळीतील लोकांना हद्दपार तर १२८ जणांना तडीपार केले आहे अशी माहिती अपर अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. ८५९४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शस्त्र परवानाधारक १२६0 जण असून, त्यांना शस्त्र जमा करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.
फलकांवर डकविले कागद
- लोकप्रतिनिधींनी शासनाच्या निधीतून केलेल्या विकास कामांबाबत शहरात लावलेले फलक कागद डकवून झाकण्याचे काम सुरू केले आहे. नजरेतून सुटलेल्या जाहिराती व फलक महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून सोमवारी काढून टाकण्यात येणार आहेत. शासकीय विश्रामधाम राजकीय व्यक्तींसाठी बंद करण्यात आले आहे.