कार्तिकेय अन् अग्नी यांचा संबंध...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 01:37 PM2020-04-21T13:37:14+5:302020-04-21T13:37:21+5:30
कार्तिकेय व अग्नी यांचा संबंध लक्षात घेऊन त्याचा दुवा ऋग्वेदाशी जोडण्याचा प्रयत्न काहीनी केला आहे.
हरिवंश या ग्रंथात ब्रह्मदेवाकडून असे भविष्य वर्तविण्यात आले आहे की, कलियुगात प्रारंभापासूनच लोक महेश्वर आणि कुमार या देवांच्या आश्रय घेतील. यावरुन कुमार आणि स्कंद किंवा कार्तिकेय आणि शिवय यांच्या समकालीन लोकप्रियतेची कल्पना येते. कुषाण राजा हुविष्काच्या नाण्यांवर स्कंद, कुमार आणि विशाख हे दिसतात. त्याबरोबरच यौधेय गणांच्या नाण्यांवर कोंबड्याबरोबर ब्रह्मदेवाचे म्हणजेच कार्तिकस्वामीचे दर्शन घडते. गुप्तकाळातही कार्तिकेयाच्या कित्येक सुंदर मूर्ती घडविल्या गेल्या. कुमार, स्कंद, देवसेनापती, गांगेय, शिवसुत, षडानन इ. कार्तिकेयाची इतर काही नावे आहेत. आज उत्तर भारतात स्वतंत्र रुपाने कार्तिकेयाचे पूजन होत नाही. पण एकेकाळी स्कंदाची पूजा येथे होत असल्याचे पुरावे शिलालेख, नाणी, मूर्ती, वाङमय आदी स्वरुपात सापडतात. पण दक्षिण भारतात मात्र सुब्रह्मण्यम या नावाने हा देव अजुनही पूजिला जातो.
कार्तिकेय व अग्नी यांचा संबंध लक्षात घेऊन त्याचा दुवा ऋग्वेदाशी जोडण्याचा प्रयत्न काहीनी केला आहे. कार्तिकेयाचे कुमार हे नाव त्याच काळातील असावे असा कयास आहे. उत्तर वैदिक काळात स्कंद हे नाव पुढे आले. हळूहळू कुमाराबरोबर सनत्, विशाख, जयंत, वैजयंत, गुह, महासेन, पूर्त, लोहिरगात्र वगैरे नावांची साखळी तयार होत गेली. कार्तिकेयाचा विशेष उत्सव स्कंदमह या नावाने ओळखला जात असे. स्कंद हा धूर्त आणि चोर यांचा देव आहे. अथर्ववेदाचे परिशिष्ट म्हणून स्कंदयाग किंवा धूर्तकल्प असा उल्लेख आहे. याच प्रसंगातील कित्तेक उल्लेख कार्तिकेयाच्या मूर्तिविज्ञानावर प्रकाश टाकतात. उदा. स्कंदाची चित्रसनाह, सिंहसनाह, शक्तिसनाह, लोहितगात्र, अष्टादशलोचन वगैरे अभिधाने मालाबरोबर त्याची धूर्त म्हणून संगती, लाल डोळे असलेला कोंबड्याचा उल्लेख इत्यादी.
नाण्यांवर स्कंद
काही विद्वानांच्या मताप्रमाणे ठोकीन नाण्यांवर दंडकमंडलु घेतलेली जी पुरुष प्रतिमा दिसते ती शक्ती व ढाल घेतलेल्या स्कंदाची आहे. काही जण तिला शिव समजतात. त्याचप्रमाणे उज्जैनच्या (मध्यप्रदेश) पूर्व कुषाणकालीन नाण्यांवर आढळणारी दंडकमंडलुधारी त्रिमुख मूर्ती कार्तिकेयाचीच आहे. स्कंद प्रथम यौधेय गणांच्या नाण्यांवर आढळतो. येथे तो सहा तोंडाचा असून, शक्ती घेतलेला आहे. या नाण्यांवर एका बाजुला कार्तिकेय व दुसºया बाजुला षष्ठी दाखविलेली आहे. याच गणाच्या दुसºया प्रकारच्या नाण्यावर तो एका तोंडाचा दाखविला असून, त्याच्या पायाजवळ कोंबडा आहे. याशिवाय उत्तर भारतातील इतर काही जनपदीस शासकाच्या नाण्यावर कुक्कुटस्तंभ आणि कोंबड्यासह तालवृक्ष दिसतो. डॉ. जितेंद्रनाथ बॅनर्जीच्या मते ही स्कंदोपासनेची प्रतीके आहेत.
गुप्तकालीन स्कंद
स्कंदोपासनेशी संबंधित गुप्तकाळातील सर्वात महत्वाचा लेखी पुरावा म्हणजे उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात बिलसाद नावाच्या गावातील दोन खांबावर असलेला कुमारगुप्त (पहिला) कालीन लेख असून, यात ब्रह्मण्यदेवस्वामी महासेनाचे विशाल मंदिर बांधल्याची नोंद आहे. कारण गुप्तसम्राट कुमारगुप्त (पहिला) हा कार्तिकेयाचा नि:स्सीम उपासक होता. त्याने आपल्या नाण्यांवर सुद्धा या देवतेला महत्वाचे स्थान दिले होते. याचप्रमाणे शांतिवर्मा (इ.स.४५५-७०)याच्या तालगुंड येथील स्तंभलेखात षडानन आणि मातृकाचा उल्लेख केला आहे. पुढील काळात गुप्तसम्राट स्कंदगुप्ताच्या एका अभिलेखात कार्तिकेयाचा मातृकांच्या बरोबर प्रामुख्याने उल्लेख केला आहे. याच प्रमाणे कदंब आणि चालुक्यांच्या घराण्याशी संबंधित शिलालेखात महासेन (स्कंद) आणि सप्तमातृकांचे उल्लेख आहेत.
दक्षिण भारतातील सुब्रह्मण्य
उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आजही कार्तिकेयाची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. तेथे त्याची लोकप्रियताही खूप आहे. दक्षिणेत तो सुब्रह्मण्य या नावाने प्रसिद्ध आहे. आपल्याकडे जसा मारुती हा लहान-मोठ्या प्रत्येक गावात असतो तसा दक्षिणेत सुब्रह्मण्य असतो. त्याची मंदिरे, शहरे, गाव, बगीचे, डोंगर वगैरे ठिकाणी असतात. कामिकागम या ग्रंथात एका ठिकाणी नगरांचे तेरा प्रकार सांगितले आहेत आणि त्याठिकाणी कोणत्या स्वरुपात सुब्रह्मण्य स्थापन करावा, हेही सांगितले आहे. उत्तरेपेक्षा दक्षिणेतील स्कंदात सर्वात मोठा फरक हा आहे की, तो ब्रह्माचारी नाही. त्याला वल्ली आणि देवसेना अशा दोन बायका आहेत. याशिवाय स्कंदशिल्पात ध्यातभिन्नत्वाने शक्तीशिवाय कोंबडा, त्रिशुल इ. दाखवितात.
- प्रा. डॉ. सत्यव्रत नुलकर
(लेखक पुरातत्त्वशास्त्र संशोधक आहेत.)