सोलापुरात आधुनिक ‘लखोबा लोखंडे’च्या चौथ्या लग्नावेळी नातेवाईक चतुर्भुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 02:12 PM2019-07-22T14:12:17+5:302019-07-22T14:15:35+5:30

सोलापूर शहर पोलीस ; तिघांविरूध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Relative Quadrilateral at the fourth wedding of modern 'Lakhoba Lokhande' in Solapur | सोलापुरात आधुनिक ‘लखोबा लोखंडे’च्या चौथ्या लग्नावेळी नातेवाईक चतुर्भुज

सोलापुरात आधुनिक ‘लखोबा लोखंडे’च्या चौथ्या लग्नावेळी नातेवाईक चतुर्भुज

Next
ठळक मुद्देतीन मुलींशी विवाह करून त्यांना पैशासाठी माहेरी हाकलून दिल्यानंतर प्रकाश जानगवळी हा पुन्हा चौथ्या पत्नीच्या शोधात होतातिघींनी सोलापूर  गाठून प्रकाश जानगवळी याच्याविरुद्ध फिर्याद दिली

सोलापूर : पहिल्या पत्नीला पैशाच्या कारणावरून मारहाण करून माहेरी पाठवले, दुसरीशी विवाह करून तीच अवस्था केली. तिसरी बरोबर विवाह करूनही तोच प्रकार सुरू ठेवला. तिघींनाही सोडून चौथ्या मुलीसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहणारा ‘तो मी नव्हेच..’ या गाजलेल्या नाटकातील लखोबा लोखंडे हा प्रत्यक्षात सोलापुरात अवतरला आहे. तिन्ही बायकांनी प्रकाश याच्यासह तिघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रकाशची आई हिराबाई, भाऊ किशोर यांना अटक केली आहे.

पती प्रकाश महादेव जानगवळी (वय ४२, रा. शेळगी, सोलापूर), दीर- किशोर महादेव जानगवळी, सासू- हिराबाई महादेव जानगवळी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, प्रकाश जानगवळी हा रिक्षा चालक असून त्याने १९ फेब्रुवारी २००६ रोजी विजापूर येथील १२ वी शिकलेल्या रजनी या मुलीशी   लग्न केले. लग्नात ६ तोळे सोने आणि ५0 हजार रुपयांचा हुंडा देऊन सासरच्या लोकांनी विजापूर येथे थाटामाटात लग्न लावून दिले. दोन महिन्याचा संसार चांगला चालतो न चालतो तोच प्रकाश याने पत्नी रजनी हिला नवीन रिक्षा घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा सुरू केला. पैशासाठी मारहाण करण्यास सुरुवात केली. 

रजनी हिला माहेरी सोडून आल्यानंतर सासºयाने एक लाख रुपये गोळा करून पुन्हा मुलीला प्रकाश याच्याकडे नांदण्यासाठी सोडले; मात्र पुन्हा त्याने गाडीची मागणी केली. रजनीच्या काकांनी गाय घेऊन दिली. काही दिवसानंतर पुन्हा पैशाची मागणी करू लागला. या त्रासाला कंटाळून रजनी माहेरी निघून गेली. ही संधी साधत प्रकाश याने २०१५ मध्ये पुणे येथील बी.कॉम. शिकलेल्या शिल्पा नावाच्या मुलीसोबत जवळीक साधली. तिला मी बीएसएनएलमध्ये क्लार्क असल्याचे सांगून लग्न केले. लग्नात हुंडा घेऊन रितसर शिल्पाला घरी घेऊन आला. काही दिवसातच तिच्या सोबतही त्याने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. शिल्पाही याच्या त्रासाला कंटाळून निघून गेली. 

प्रकाश याने पुन्हा २०१६ मध्ये जालना येथील सुरेखा रंगप्पा झारखंडे या मुलीशी जवळीक साधली व तिसरे लग्न केले. तिलाही प्रकाश याने काही दिवसात सासरहून पैसे आणण्याची मागणी करू लागला. सुरेखा  यांना दिवस गेल्यानंतर त्याने बाळाला जन्म देऊ नको म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरेखाही याच्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली. सुरेखा यांनी बाळाला जन्म दिला. तिन्ही बायका घरी नव्हत्या त्यामुळे प्रकाश जानगवळी हा बिनधास्त होता. 

समाजातील जागरुक व्यक्तीमुळे चौथा डाव फसला
- तीन मुलींशी विवाह करून त्यांना पैशासाठी माहेरी हाकलून दिल्यानंतर प्रकाश जानगवळी हा पुन्हा चौथ्या पत्नीच्या शोधात होता. अशी एक मुलगी त्याने पसंत केली होती, तिच्यासोबत लग्न करण्याचा डाव आखला होता. यापूर्वी झालेले तीन लग्न लपवून तो चौथ्या मुलीसोबत संसार थाटण्याचे स्वप्न पहात होता.  यासाठी त्याने जोरदार प्रयत्न सुरू केले होते.  या प्रयत्नात असतानाच त्याचा डाव उधळून लावण्यात आला. 

- हा प्रकार समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला समजला. या व्यक्तीने तिन्ही बायकांशी संपर्क साधून ही माहिती दिली. तिघींनी सोलापूर  गाठून प्रकाश जानगवळी याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. 

Web Title: Relative Quadrilateral at the fourth wedding of modern 'Lakhoba Lokhande' in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.