१०८ रुग्णवाहिकेसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना करावे लागते वेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:20 AM2021-04-26T04:20:05+5:302021-04-26T04:20:05+5:30
कोरोना महामारीत गरज वाढल्याने रुग्णांचे नातेवाईक १०८ क्रमांकावर सतत संपर्क साधून रुग्णवाहिकेची मदत घेत आहेत. पूर्वी रस्त्यावर अपघात किंवा ...
कोरोना महामारीत गरज वाढल्याने रुग्णांचे नातेवाईक १०८ क्रमांकावर सतत संपर्क साधून रुग्णवाहिकेची मदत घेत आहेत. पूर्वी रस्त्यावर अपघात किंवा गरीब लोक आजारपणात १०८ वर संपर्क साधून सरकारी रुग्णवाहिकेची मदत होत होती. पण, आता कोरोना महामारीच्या काळात रस्त्यावर एकही वाहन मदतीला येत नसल्याने सर्वसामान्यांसह श्रीमंतसुद्धा १०८वर संपर्क साधून रुग्णवाहिकेची मदत मागत आहेत.
सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मागणी वाढल्याने १०८ रुग्णवाहिकेचे कॉल आता वेटिंगवर आहेत.
जिल्ह्यातील १०८च्या ३५ रुग्णवाहिकांवर १०८ डॉक्टरांसह ८० चालक सेवा देत आहेत. यातील २१ रुग्णवाहिका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ३१ हजार ६२ कोरोनाबाधितांना तत्पर सेवा देऊन जीवदान दिले आहे, तर इतर १३ हजार ४५४ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. जानेवारीत १६२८ कोरोनाबाधित व इतर २१४७, फेब्रुवारीत ३११५ कोरोनाबाधित व २०२९ इतर तर मार्चमध्ये ४९९१ कोरोनाबाधित व इतर ९०७ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवण्याची जबाबदारी १०८ रुग्णवाहिकांनी पार पाडली आहे.
कोट :::::::::::::::::
सोलापूर जिल्ह्यात असलेल्या ३५ पैकी १० रुग्णवाहिका (एएलएस) व २५ रुग्णवाहिका (बीएलएस) आहेत. त्यातील २१ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. कोरोनाच्या काळात अतिगंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेमुळे जीवदान मिळाले आहे. रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध असल्यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार करून रुग्णालयात दाखल केले जाते.
- अनिल काळे
जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका