व्हेंटिलेटर, रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची बारामती, इंदापूरमध्ये वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:19 AM2021-04-14T04:19:59+5:302021-04-14T04:19:59+5:30
करमाळा : तालुक्यात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही. कोरोना रूग्णांना व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली तर त्यांना तालुक्याबाहेर पाठवावे लागते. ...
करमाळा : तालुक्यात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही. कोरोना रूग्णांना व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली तर त्यांना तालुक्याबाहेर पाठवावे लागते. सध्याच्या परिस्थितीत बाहेरदेखील व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी नातेवाईकांना चक्क रुग्णाला घेऊन बारामती आणि इंदापूरमध्ये वणवण करावी लागते. प्रशासनाने तत्काळ करमाळा तालुक्यात व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करावी. प्रशासनाने करमाळा व जेऊर येथे व्हेंटिलेटर बेडसह सर्व सुविधांनी युक्त असे कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.
तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शंभरावर गेली आहे. या स्थितीत करमाळा तालुक्यात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही. शिवाय रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना जीव गमावण्याची वेळ आली आहे.
याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना माजी आमदार नारायण पाटील यांनी निवेदन दिले. करमाळा तालुक्यात दररोज ७० रुग्ण सापडत आहेत. कोरोनावर उपचारासाठी होणारा खर्च गोरगरिबांना परवडणारा नाही. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता तालुक्यात करमाळा व जेऊर येथे उपजिल्हा रुग्णालये आहेत. येथे स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याची गरज आहे. या सेंटरमध्ये व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड याची व्यवस्था होणे आवश्यक आहे.
---
नातेवाईकांची बारामतीत वणवण
तालुक्यात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यासाठी पुणे, बारामतीसह अहमदनगर, सोलापूर या ठिकाणी वणवण करीत शोध घ्यावा लागत आहे . याठिकाणी जाऊनदेखील इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. करमाळ्यातील डॉक्टर देखील हतबल झाले आहेत.
----