नातलगांनी नाकारले, पोलिसांनी फटकारले, तेव्हा कुठे कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 01:26 PM2021-04-30T13:26:30+5:302021-04-30T13:26:37+5:30
सोलापूर जिल्ह्यातील स्थिती : बेवारस प्रेतांना मनपा, सामाजिक संघटना देतात अग्नी
सोलापूर : कोरोनामुळे मरण पावलेल्या काही रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रक्ताचे नातलग तयार नसल्याचे चित्र आजही कायम आहे. त्यामुळे शवागृहात पाच ते दहा दिवस मृतदेह पडून असतात. या नातलगांना पोलिसांमार्फत तंबी देऊन बोलावले जात आहे.
अनेक नातलग गंभीर आजारी रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. एक-दोन दिवस औषधोपचारासाठी पैसे देऊन गायब होतात. मृत्यूची खबर दिल्यानंतर हे नातेवाईक येत नाहीत. महापालिकेने कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी टायगर ग्रूप या संस्थेची नेमणूक केली आहे. या संस्थेचे केतन देवी म्हणाले, लोकांमध्ये कोरोनाबद्दल मोठी भीती आहे. आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षभरात दोन हजारहून अधिक मृतांवर अंत्यसंस्कार केले. गेल्या वर्षी ज्या मृतांचे नातेवाईक आले नाहीत त्यांच्यावर पालिकेचे कर्मचारी राजू डोलारे आणि आमचे कार्यकर्ते अंत्यसंस्कार करायचे. मात्र यातून वाद नको म्हणून काहीही करुन नातेवाइकांना बोलाविण्याचा निर्णय घेतला.
काही नातेवाईक कोरोनाच्या भीतीमुळे येत नाहीत. त्यांना ग्रामसेवक, तलाठी आणि जवळच्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून निरोप दिला जातो. हे नातेवाईक आले की त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यांना मृतांचा चेहरा दाखविला जातो. पोलिसांना खबर गेली की अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या सहा महिन्यात ५० हून अधिक लोकांसाठी ही पध्दत अवलंबली असल्याचे देवी म्हणाले.
जिसका कोई नही उसका...
एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत एकूण २० बेवारस लोकांचा मृत्यू झाला. या सर्व व्यक्तींवर महापालिकेचे मोदी स्मशानभूमीतील कर्मचारी राजू डोलारे यांनीच अंत्यसंस्कार केले. या व्यक्तींचे मृतदेह टायगर ग्रूपनेच त्यांच्याकडे सोपविले. वर्षभरात १२० हून अधिक मृतांचे नातेवाईक आलेच नाहीत. त्यांच्यावर राजू डोलारे, टायगर ग्रूपचे सदस्य, लादेन शेख आणि सहकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.
- गेेेेल्या वर्षभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू - २०७१०
- मनपा, टायगर ग्रुप, लादेन शेख यांनी केलेले अंत्यसंस्कार १२०
वाद टाळण्याचा प्रयत्न
कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यास पीपीई किट घालून पाच जणांना अंत्यसंस्कारला परवानगी दिली जाते. अनेक मृतांचे केवळ एक किंवा दोन नातेवाईक अंत्यसंस्काराला हजर असतात. काहीवेळा गर्दीही होते. भावनेचा विषय असतो. काही बोललो तर वाद होतात. परंतु, लोक २० ते २५ मिनिटांसाठी स्मशानभूमीत असतात. त्यामुळे वाद घालत नसल्याचे पालिकेचे कर्मचारी सांगतात.
कोरोनाबद्दल लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळेच कदाचित नातेवाईक येत नसतील. ज्यांचे नातेवाईक येत नाहीत त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
- राजू डोलारे, मनपा कर्मचारी, मोदी स्मशानभूमी.