नातेवाईकांनी नाकारले; गावातील तरुणांनी स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:21 AM2021-05-16T04:21:33+5:302021-05-16T04:21:33+5:30
मूळचे माण तालुक्यातील परंतु सध्या लोटेवाडी (ता. सांगोला) येथे रहिवासी परशुराम शेळके या वृद्धास पत्नीने घटस्फोट दिला ...
मूळचे माण तालुक्यातील परंतु सध्या लोटेवाडी (ता. सांगोला) येथे रहिवासी परशुराम शेळके या वृद्धास पत्नीने घटस्फोट दिला होता. त्यामुळे तो श्रीक्षेत्र म्हसोबा देवस्थान येथे मिळणाऱ्या प्रसादावर तसेच मोलमजुरी करून त्याच ठिकाणी आपली उपजीविका भागवत असे. त्याला मुलगी होती, परंतु तिलाही मर्यादा असल्यामुळे तीही त्याच्यापासून दूर होती. दुर्दैवाने परशुरामला कोरोनाची लागण झाल्याने तो प्राथमिक शाळेत अंथरुणावर खिळून होता. त्याठिकाणी त्याला मुलगी लांबूनच जेवण देत होती. परंतु त्याच्याजवळ कुणीही जात नव्हते. अखेर शुक्रवारी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि अंत्यसंस्काराचा विषय समोर आला.
बायको असून घटस्फोट झाल्याने ती येऊ शकत नव्हती. मुलगी आली परंतु तिलाही मर्यादा आल्या. अखेर लोटेवाडी गाव कृती समितीमार्फत तरुणांनी परशुरामवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला. सदरचा प्रकार पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग यांना कळवून अंत्यविधीची तयारी केली. डॉ. अविनाश खांडेकर यांनी त्यांच्या चितेला मुखग्नी दिला तर सम्राट गडहिरे यांनी या कामी त्यांना मदत केली.
सरपंच विजय खांडेकर, उपसरपंच दादा सावंत, ॲड. शंकर सरगर, दादासाहेब लवटे, पोलीस पाटील धनाजी पाटील व सचिन सावंत, ग्रामसेवक बुरूगंले, आरोग्य सेवक देवडकर, दादा सातपुते, सागर लवटे, संतोष लवटे, अमोल सावंत, दादा जावीर आदी ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
फोटो :::::::::::::::::
परमेश्वर शेळके