आस्थापना खर्चाची अट शिथिल; सोलापूर महापालिकेत निघणार ३४० पदांची नोकरभरती
By Appasaheb.patil | Updated: February 27, 2023 17:15 IST2023-02-27T17:13:06+5:302023-02-27T17:15:20+5:30
रोजंदारी, कंत्राटी, मानधनावरील कामगारांना कायम करा; कामगार संघटना कृती समितीची मागणी

आस्थापना खर्चाची अट शिथिल; सोलापूर महापालिकेत निघणार ३४० पदांची नोकरभरती
सोलापूर : आस्थापना खर्चाची अट शिथिल झाल्याने महापालिकेत लवकरच ३४० रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेत महापालिकेत सध्या रोजंदारी, कंत्राटी व मानधनावरील कामगारांना रिक्त जागेवर कायम करावे, अशी मागणी सोलापूर महानगरपालिका कामगार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चाची अट शासनाने शिथिल केल्याने अत्यावश्यक सेवेतील पीएचईकडील जलशुद्धीकरण केंद्राकडील १०० मजूर, पंप ऑपरेटर, चावीवाले, तसेच विविध कार्यालयांतील ४० संगणक चालक, वाहनचालक, आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, आया, स्वीपर, आरोग्य निरीक्षक या रोजंदारी, कंत्राटी व मानधनावरील सध्या कार्यरत असलेल्या कामगारांना रिक्त जागेवर कायम करावे, या मागणीसाठी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना निवेदन देण्याचे व आंदोलनात सज्ज राहण्याचा निर्णय कामगार नेते अशोक जानराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जलशुद्धीकरणाकडील मजूर, संगणक चालक, चावीवाले, आया, पंप ऑपरेटर बहुसंख्येने उपस्थित होते.