शेळीचे दूध पिऊन वाढलेल्या पाडसाची नैसर्गिक अधिवासात मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 04:26 PM2020-08-14T16:26:43+5:302020-08-14T16:28:40+5:30
निलंग्याहून मेंढपाळाने आणले होते सोलापुरात; वनविभागाच्या मोहिमेला वन्यजीवप्रेमींची साथ
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : सोरेगाव येथे एका मेंढपाळाकडे पाडस आढळून आले. वनविभाग व नेचर कॉन्झर्वेशनच्या सदस्यांनी या पाडसाची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली. विशेष म्हणजे मुक्त करण्यात आलेले पाडस शेळीचे दूध पिऊन वाढले होते.
बुधवारी दुपारी सचिन पाटील आणि प्रशांत चांदणे यांनी एसआरपी कॅम्पजवळील शेतामध्ये चरायला आलेल्या शेळ्या- मेंढ्यांच्या कळपात हरणाचे पिल्लू असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक पाडसाचा ताबा घेण्यासाठी सोरेगाव शिवारात वाहनासह दाखल झाला. त्यांना सोरेगाव परिसरातील शेतामध्ये शेळ्या-मेंढ्यांसोबतच एक हरणाचे पिल्लू चरताना दिसून आले. मेंढपाळाकडे चौकशी केली असता ते कर्नाटकातून आल्याचे सांगितले.
वनविभागाच्या अधिकाºयांनी मेंढपाळाला वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन अधिनियम १९७२ बाबत माहिती दिली. कोणत्याही वन्यजीवाला पाळणे हा अपराध असल्याचे सांगितले. वन्यजीवाला पाळल्यास त्याच्या नैसर्गिककरीत्या जगण्याच्या क्रियेमध्ये आणि निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये बाधा पोहोचत असल्याबाबत जागृत केले. वनविभागाच्या अधिकाºयांना सकारात्मक प्रतिसाद देऊन मेंढपाळाने पाडसाला वनविभागाच्या स्वाधीन केले. वनविभागाने पाडसाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. या मोहिमेत वन परिमंडळ अधिकारी चेतन नलावडे, वनरक्षक शुभांगी कोरे, वनरक्षक यशोदा आदलिंगे, वनरक्षक बापू भोई, वनरक्षक अनिता शिंदे, वाहनचालक कृष्णा निरवणे असे पथक होते. यासाठी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या पंकज चिंदरकर यांनीही मदत केली.
दूध पिणारे पाडस चरायलाही शिकले
मार्च महिन्यात कर्नाटकातून लातूर जिल्ह्यातील निलंग्यामध्ये आले असता माळरानावर त्यांना नुकतेच जन्मलेले हरणाचे पिल्लू दिसले. आजूबाजूला शोधले असता हरणाचा कळप किंवा त्याची आई दिसून आली नाही. माळावरचे मोकाट कुत्रे किंवा लांडगे त्याला मारतील म्हणून मेंढपाळाने त्याला आपल्या कळपाबरोबर घेतले. शेळीचे दूध पिऊन हे पिल्लू वाढले. तसेच आता ते गवत- पालादेखील चरायला शिकले होते. त्याला कधी बांधूनही ठेवले नाही. मोठे झाले की ते स्वत:हून निघून जाईल. तिथे सोडले तर कुत्रे त्याला भक्ष्य बनवतील, या भीतीने त्याला सोबत घेतल्याचे मेंढपाळाने सांगितले.