शेतकऱ्यांना दिलासा; बाळे रेल्वेस्थानकावर होणार कार्गो टर्मिनल
By Appasaheb.patil | Published: December 31, 2020 04:40 PM2020-12-31T16:40:58+5:302020-12-31T16:41:09+5:30
किसान रेल्वेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर रेल्वेचे मोठे पाऊल: पीपीपी मॉडेलअंतर्गत होणार उभारणी
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहर व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेल्वे मंत्रालयाकडून नवीन वर्षाची जणू भेट मिळाली आहे. हरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या बाळे रेल्वेस्थानक परिसरात आता शेतकऱ्यांसाठी कार्गो टर्मिनल होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
भारतीय रेल्वे मंत्रालयाने देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल कमी वेळेत परराज्यांतील बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी किसान रेल्वे सुरू केली. या किसान रेल्वेला सोलापूर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सोलापुरात कार्गो टर्मिनल सुरू होणार याबाबत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील अधिकाऱ्यांना कार्गो टर्मिनलसाठी स्थानक निश्चित करण्याची विचारणा झाली होती, त्यानुसार सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी बाळे रेल्वेस्थानक परिसरात कार्गो टर्मिनल करण्याचा प्रस्ताव पाठविला होता, त्यानुसार भारतीय रेल्वे मंत्रालयाने बाळे रेल्वेस्थानकावर कार्गो टर्मिनल करण्यास हिरवा कंदील दाखविल्याचे सांगण्यात आले. सोलापूर विभागातून केळी, द्राक्षे, डाळिंब, ढोबळी मिरची, सफरचंद, पेरू, बोरं, सीताफळ, पपई, लिंबूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, आगामी काळात शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त माल कार्गो टर्मिनलपासून मार्गस्थ व्हावा या उद्देशाने या टर्मिनलची निर्मिती करण्यात येणार आहे.
कोल्ड स्टोअरेजची सोय
मागील काही महिन्यांपासून रेल्वे बोर्डाकडून कार्गो टर्मिनलसाठी सोलापूर विभागातील विविध स्थानकाची चाचपणी करण्यात आली होती, कोणत्या स्थानकावरून सर्वाधिक माल लोड होतो हे पाहण्यात आले. बाळे मालधक्क्याशेजारी कोल्ड स्टोअरेजची सोय असलेले कार्गो टर्मिनल बांधले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा झालेल्या १००व्या किसान रेल्वेच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्गो टर्मिनल व कोल्ड स्टोअरेजबाबत भाषणात उल्लेख केला होता.
बाळे रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या मालधक्क्यांचा पीपीई मॉडेलअंतर्गत विकास करण्यात येणार आहे. त्याबाबतची टेंडर प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. बाळे रेल्वेस्थानक परिसरात कार्गो टर्मिनलबाबत अद्याप विचार नाही.
- प्रदीप हिरडे,
वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर रेल्वे विभाग
कार्गो टर्मिनल झाल्यास सोलापूर शहरासोबत जिल्ह्यातील बराच शेतमाल परराज्यात विक्रीस जाईल, त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. रेल्वेच्या माध्यमातून कमी वेळेत शेतकऱ्यांचा शेतमाल किसान रेल्वेमुळे परराज्यांत कमी भाड्यात जात असल्यामुळे चांगला दिलासा मिळत आहे.
- राजेंद्र कांबळे,
सोलापूर रेल्वेप्रवासी संघटना, सोलापूर