शेतकऱ्यांना दिलासा; दोन महिन्यांत गाईच्या दूध दरात सात रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 05:35 PM2022-03-28T17:35:56+5:302022-03-28T17:35:58+5:30
३५ रुपये प्रतिलीटर दर
सोलापूर : तिरुमला, दोडला, हॅटसन हे व इतर दूध संघ गाईच्या दुधाला ३५ रुपये दर देत असतानाच, राज्यातील सर्वाधिक संकलन असलेल्या इंदापूरचा दूध संघ १ एप्रिलपासून खरेदी दरात दोन रुपयाची वाढ करीत ३५ रुपये दर देणार आहे. दोनच महिन्यांत गाईच्या दूध दरात सात रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दोन वर्षे कोरोनाच्या कारणांमुळे दूध दर १७ रुपयांवर आला होता. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोधन विक्री केले. आपोआपच दुभत्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली. जनावरांची संख्या घटल्याने दूध, दूध पावडर व बटर मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळेच दुधाचे दर वाढत असल्याचे सांगण्यात आले. यातून शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत.
दोडला, हॅटसर, तिरुमला या दूध संस्थाकडून शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला सध्या प्रतिलीटर ३५ थेट दर दिला जात आहे. इतरही काही दूध संस्था ३५ रुपये दर देत असते, तरी मोठ्या दूध संस्था मात्र ३३ रुपये दर देत आहेत. राज्यात सर्वाधिक दूध संकलन इंदापूर येथील दूध डेअरीचे होते. या सोनाई दूध संघाने १ मार्चपासून दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ करून प्रतिलीटर ३५ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.
...................
१०० रुपयाने वाढली पावडर
मागील वर्षी कोरोना कालावधीत दुध विक्रीवर कमालीचा परिणाम झाला होता. लग्न समारंभ, सामुदायिक कार्यक्रम, हाॅटेल बंद असल्याने दूध शिल्लक राहत असे. त्यामुळे दूध पावडर तयार करण्यावर भर दिला होता. मागील वर्षी दूध पावडरचा दर प्रति किलो १८५ रुपयांवर आला होता. सध्या २८५ व त्यापेक्षा अधिक दराने दूध पावडर विक्री होत आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
................
असा वाढतोय दूध दर
- * नोव्हेंबर २१ - २५ रुपये.
- * २१ डिसेंबर २१ - २६ रुपये.
- * १ फेब्रुवारी २२ - २७ रुपये.
- * ११ फेब्रुवारी २२ - २८ रुपये.
- * २१ फेब्रुवारी २२ - २९.५० रुपये.
- * १ मार्च २२ - ३१ रुपये.
- * ११ मार्च २२ - ३३ रुपये.