‘लिंगायत समाजाच्या धर्मगुरुंनी राजकारणात सक्रीय होऊ नये’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 05:08 AM2019-03-04T05:08:37+5:302019-03-04T05:08:41+5:30
लिंगायत धर्मगुरुंनी राजकारणात सक्रीय होऊ नये. सक्रीय झाल्यास त्यांना लिंगायत समाजातील रोषाला सामोरे जावे लागेल, यासह सहा ठराव येथील लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेत करण्यात आले. परिषदेचा रविवारी समारोप झाला.
सोलापूर : लिंगायत धर्मगुरुंनी राजकारणात सक्रीय होऊ नये. सक्रीय झाल्यास त्यांना लिंगायत समाजातील रोषाला सामोरे जावे लागेल, यासह सहा ठराव येथील लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेत करण्यात आले. परिषदेचा रविवारी समारोप झाला.
व्यासपीठावर बंगळुरुच्या बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती, अ. भा. लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक अॅड. अविनाश भोसीकर, पुण्याचे लिंगायत धर्म अभ्यासक शशिकांत पट्टण, परिषदेचे संयोजक विजयकुमार हत्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र सुरु करावे, लिंगायत आरक्षण, महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुटी जाहीर करणे, मंगळवेढा येथील
बसवेश्वर स्मारकाच्या कामास गती मिळावी आदी ठरावही करण्यात आले.
महात्मा बसवेश्वरांच्या वचनात खूप मोठी शक्ती आहे. देवदेवतांच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. आपल्या गळ्यातील लिंग हाच आपला देव. आपण कपाळावर विभुती लावतो म्हणजे त्या देवाला लावतो. लिंगायत बांधवांनी गळ्यात लिंगधारणा करावी, असे आवाहन करण्यात आले. ९ आॅगस्टला मुंबईत लिंगायत बांधवांचा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे अविनाश भोसीकर यांनी सांगितले.