धर्मगुरुंनी राजकारणात सक्रिय होऊ नये..अन्यथा रोषास सामोरे जावे लागेल; लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेत सात ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:56 PM2019-03-04T12:56:51+5:302019-03-04T12:59:37+5:30
सोलापूर : लिंगायत धर्मगुरुंनी राजकारणात सक्रिय होऊ नये. सक्रिय झाल्यास त्यांना लिंगायत समाजातील तीव्र रोषांना सामोरे जावे लागेल, यासह ...
सोलापूर : लिंगायत धर्मगुरुंनी राजकारणात सक्रिय होऊ नये. सक्रिय झाल्यास त्यांना लिंगायत समाजातील तीव्र रोषांना सामोरे जावे लागेल, यासह सहा ठराव करण्यात आले. रविवारी सायंकाळी विमानतळासमोरील मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेचा समारोप होताना या ठरावावर एकमत झाले.
व्यासपीठावर बंगळुरुच्या बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती, अ. भा. लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक अॅड. अविनाश भोसीकर, पुण्याचे लिंगायत धर्म अभ्यासक शशिकांत पट्टण, परिषदेचे संयोजक विजयकुमार हत्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र सुरु करावे, लिंगायत आरक्षण, महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुटी जाहीर करणे, मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकाच्या कामास गती मिळावी आदी ठरावही यावेळी करण्यात आले.
महात्मा बसवेश्वरांच्या वचनात खूप मोठी शक्ती आहे. देवदेवतांच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. आपल्या गळ्यातील लिंग हाच आपला देव. आपण कपाळावर विभुती लावतो म्हणजे त्या देवाला लावतो, असे सांगताना त्यांनी प्रत्येक लिंगायत बांधवांनी गळ्यात लिंगधारणा करावी, असे आवाहन केले. तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता अरविंद जत्ती यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी बसव केंद्राच्या सिंधूताई काडादी होत्या. विजयकुमार हत्तुरे यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या सत्रात ‘लिंगायत धर्म मान्यता व अल्पसंंख्याक दर्जा-समज अन् गैरसमज’ या विषयावर डॉ. शशिकांत पट्टण यांनी आपले विचार मांडले.
दुसºया सत्रात कोल्हापूरचे बसवतत्त्व अभ्यासक राजशेखर तंबाके यांच्या अध्यक्षतेखाली ‘सोलापूर जिल्ह्यातील लिंगायतांचे योगदान’ या विषयावर प्रा. संगमेश्वर नीला, ‘लिंगायतांचे राष्ट्र निर्मितीतील योगदान’ या विषयावर लातूरचे प्रा. भीमराव पाटील यांनी आपले मत मांडले. तिसºया सत्रात पत्रकार चन्नवीर भद्रेश्वर मठ, डॉ. सरिता पट्टणशेट्टी, प्रा. बसवराज कोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारोप सत्रात डॉ. अनिल सर्जे यांनी बसवेश्वरांच्या तत्त्वांवर प्रकाश टाकला. यावेळी लिंगायत समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महापौर शोभा बनशेट्टी यांनी मनपा सभागृहात महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा लावण्याचे आश्वासन दिले.
९ आॅगस्टला मुंबईत महामोर्चा
- अविनाश भोसीकर यांनी लिंगायत आरक्षणाचा मुद्दा मांडताना येत्या ९ आॅगस्टला मुंबईत लिंगायत बांधवांचा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगताना पुढील महिन्यात बसव यात्रा काढणार असल्याचे नमूद केले. पुणे येथून या बसव यात्रेस प्रारंभ होणार असून, प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातून या यात्रेच्या माध्यमातून स्वतंत्र लिंगायत धर्माची संकल्पना मांडण्यात येणार आहे.
स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी अनेक मोर्चे निघाले. सोलापुरात समाजाची १० लाख लोकसंख्या असताना एक टक्काही समाज मोर्चात सहभागी झाला नाही. आपल्या पुढच्या पिढीसाठी समाज बांधव पुढे येण्याची गरज आहे.
-राजशेखर तंबाके (कोल्हापूर)
अभ्यासक- बसवतत्व.
स्वतंत्र लिंगायत धर्म हा आमचा कायदेशीर हक्क आहे. २०२० मध्ये होणाºया जनगणनेवळी प्रत्येक लिंगायतांनी फॉर्म भरताना त्यातील इतर कॉलममध्ये लिंगायत धर्म असाच उल्लेख करावा.
-डॉ. शशिकांत पट्टण (पुणे)
लिंगायत धर्म अभ्यासक.