तुळशीच्या मोहरमने पिढ्यान् पिढ्या सांभाळलाय धार्मिक सलोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:00 PM2018-09-14T18:00:40+5:302018-09-14T18:02:24+5:30
बाळासाहेब बोचरे
सोलापूर: मोहरम या सणाला धार्मिकतेची जोड असली तर माणसं एकत्र आली की धर्माच्या अभेद्य भिंतीही ढासळतात आणि माणसं कशी गुण्यागोविंदाने राहतात हे चित्र पाहायला मिळतंय माढा तालुक्यातल्या तुळशी गावात. इथला मोहरमचा सण हा हिंदू-मुस्लीम मिळून करतात. अख्खा गाव त्यासाठी आपले तन, मन आणि धन अर्पण करतो. नव्या पिढीला आपल्या गावच्या या उत्सवाचं मोठं अप्रुप असून नोकरीधंद्यानिमित्त देशाटन केलेले तुळशीकर आपल्या गावचा हा अभिमान सांगितल्याशिवाय राहात नाहीत. गावचे राष्टÑपती पुरस्कारप्राप्त शिक्षक जयराम दगडे गुरुजी यांनी त्यावर पुस्तकही लिहिलं आहे.
दहा दिवस चालणाºया या उत्सवासाठी एक उत्सव कमिटी असते. मुस्लीम तिथीनुसार यंदा १० सप्टेंबर रोजी कुदळ मारली असून ११ रोजी मोहरमचा पहिला दिवस मोजला जातो. मुस्लीम समाजाच्या वतीने वाजत गाजत येऊन पूजा करून कुदळ मारली जाते व खतम दिली जाते. यावेळी गावकरीही उपस्थित असतात. पाचव्या दिवशी दोन्ही सवाºयांची प्रतिष्ठापना केली जाते. एक सवारी कृष्णा मामा माळी यांची आणि दुसरी सवारी साहेबलाल भाई यांची. माळी यांचे वंशज शिवाजी देवकर तर साहेबलाल यांचे वंशज बशीरभाई मुलाणी हे सध्या सवारी घेतात. कृष्णा माळी यांची समाधी जेऊर येथे आहे. त्या ठिकाणी शिवाजी देवकरसह गावकरी सहा तारखेला जातात व खतम देतात. सातव्या दिवशी कृष्णा मामाची सवारी उठवली जाते.
सवारी घोटीच्या बंधूच्या भेटीसाठी जाते. आठव्या दिवशी गावकरी धुला खेळून वातावरण निर्मिती करतात. नवव्या दिवशी दोन्ही सवारी उठवल्या जातात. खेळवल्या जातात. त्यावेळी गावकरी सवारीसोबत धुला खेळतात. शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. दहाव्या दिवशी दिवसभर दोन्ही सवाºयांची नगरप्रदक्षिणा होते. नगारा ताशा, घंटा आदी वाद्यांसह गावकरी आनंदाने सवारीपुढे नाचतात. २० सप्टेंबर रोजी या उत्सवाची सांगता होणार आहे.