रेमडेसिविर, ऑक्सिजन देऊ, चाचण्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:19 AM2021-04-26T04:19:52+5:302021-04-26T04:19:52+5:30
अक्कलकोट : डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला सर्वतोपरी मदत करू. जेणेकरून तालुक्यातील रुग्णांवर याच ठिकाणी उपचार होतील. कोरोनाची चाचणी वाढवा, ...
अक्कलकोट : डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला सर्वतोपरी मदत करू. जेणेकरून तालुक्यातील रुग्णांवर याच ठिकाणी उपचार होतील. कोरोनाची चाचणी वाढवा, लसीकरण वाढवा. यामुळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयावरील भार कमी होईल. सध्या ऑक्सिजन पुरवठा सुरू असून रेमडेसिविर, व्हेंटिलेटरसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या अक्कलकोट येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. मैंदर्गी रोडवर स्वामी समर्थ रुग्णालयात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर म्हास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रांताधिकारी सुप्रिया डांगे, तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, जिल्हा मौखिक रोग अधिकारी डॉ. रोहन वायचळ, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. ए. एन. पिंपळे, डॉ. निखिल क्षीरसागर, डॉ. मुस्तफा सलगरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार, मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, मैंदर्गी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, दुधनीचे आतिष वाळूंज, नगरसेवक अशपाक बळोरगी, अक्कलकोटचे मलिक बागवान, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लाडवाढ उपस्थित होते.
---
कोरोनाविरोधात जिवाचे रान करावे लागेल : डांगे
पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत कोरोनाबाबत तालुक्यातील परिस्थिती जाणून घेतली.
प्रांताधिकारी सुप्रिया डांगे यांनी एकूण रुग्ण संख्या, उपचार घेत असलेले रुग्ण, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण, औषध गोळ्यांचा साठा, कार्यरत आरोग्य यंत्रणा, महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या कोरोना विषयक उपाययोजना यांची सविस्तर माहिती दिली. यावरून पालकमंत्री यांनी प्रशासनाला कोरोनाविरुद्ध पुकारलेले युद्ध जिंकण्यासाठी सर्वांना जिवाचे रान करावे लागणार आहे. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
--
फोटो : २५ अक्कलकाेट
अक्कलकोट येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यावेळी खासदार जयसिद्धेवर म्हास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी सुप्रिया डांगे, तहसीलदार अंजली मरोड, डॉ अशोक राठोड उपस्थित होते.