कुर्डूवाडीत माढा, करमाळा तालुक्यांसाठी रेमडेसिविर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:20 AM2021-04-14T04:20:06+5:302021-04-14T04:20:06+5:30
जिल्हास्तरीय नेमलेली नियंत्रण समिती व आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि कुर्डूवाडी येथील महसूल उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी ज्योती कदम ...
जिल्हास्तरीय नेमलेली नियंत्रण समिती व आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि कुर्डूवाडी येथील महसूल उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्या कार्यालयाकडे माढा व करमाळा तालुक्यासाठी उपलब्ध रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला. त्यात मंगळवारी या दोन तालुक्यांसाठी एकूण ६० इंजेक्शन आली. दिवसभरात त्यातील ४५ च्या इंजेक्शन रुग्णांच्या नातलगांनी नेले. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र कदम यांनी ही माहिती दिली.
कुर्डूवाडीत डॉ. बोबडे हॉस्पिटल- २५, डॉ. साखरे हॉस्पिटल-१७ व आधार हॉस्पिटलमध्ये ५० रुग्णांवर उपचार केले जात आहेत. टेंभुर्णीतील यशश्री हॉस्पिटलमध्ये १४ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. म्हणजे या एकूण चार हॉस्पिटलमध्ये सध्या जवळपास शंभरच्या आसपास रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या संबंधित इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना ते सोलापूरहून आणावे लागत होते. रात्री उशिरापर्यंत शेवटी इंजेक्शन मिळते की नाही याबाबत साशंकता निर्माण व्हायची. याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांकडून आलेल्या तक्रारीवरून ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला. जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन येथील उपविभागीय कार्यालयात ही सेवा मंगळवारी लागलीच सुरू करण्यात आली. त्याचा फायदा येथील अनेक रुग्णांना दिवसभर झाला असल्याची माहिती रुग्णांचे नातेवाईक मानसिंग हांडे व बबलू गवळी यांनी दिली.
रेमडेसिविर इंजेक्शन कुर्डूवाडीत उपलब्ध होऊ लागल्याने करमाळा व माढा तालुक्यांतील रुग्णांच्या नातेवाइकांना सोलापूरला जायचा हेलफाटा वाचला. सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात याबाबत कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्वरित उपलब्ध सध्या होत आहे.
----