वादळ, वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग ते पंढरपूरदरम्यान बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवा
By दिपक दुपारगुडे | Published: May 16, 2024 05:37 PM2024-05-16T17:37:49+5:302024-05-16T17:37:56+5:30
आषाढवारी पूर्वनियोजनाबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात खातेप्रमुखांची प्रशासकीय बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी आदेश दिले.
सोलापूर : आषाढवारी पूर्वनियोजनाबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत वादळ, वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन वारकरी व भाविकांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहरातील बेकायदा होर्डिंग्ज तत्काळ हटवावेत तसेच अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील रस्त्याची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे आदेश अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिले.
आषाढवारी पूर्वनियोजनाबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात खातेप्रमुखांची प्रशासकीय बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी आदेश दिले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांबरोबर आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपुरात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक येतात. यंदाची आषाढी यात्रा आरोग्यसंपन्न, निर्विघ्नरीत्या पार पडावी, यासाठी प्रशासनातील सर्वच विभागांनी वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी - सुविधांबाबत दक्षता घेऊन सुनियोजित आणि सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलिस उपाधीक्षक अर्जुन भोसले, परिविक्षाधिन सहायक पोलिस अधीक्षक शुभम कुमार, तहसीलदार सचिन लंगुटे, राजाराम भोंग, कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरणचे अभियंता विजय पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे केशव घोडके, वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके, जे. व्ही. इंगवले, उपमुख्याधिकारी सुनील वाळूंजकर, मनोज श्रोत्री, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.